अपेक्षेप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा सोमवारी लावून धरला. राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी व्हेलमध्ये जमून सरकारविरोधात घोषणा दिल्या. या कारणामुळे राज्यसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. तर लोकसभेमध्येही शून्य काळात काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तराखंडमधील परस्थिती काँग्रेसमधील अंतर्गत कारणांमुळेच तयार झाली आहे, असे सांगितले.
राज्यसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, राज्यघटनेतील तरतुदीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. ते आम्ही कधीच खपवून घेणार नाही. गेल्या वर्षभरापासून आम्ही हे बघतोय की सत्ताधारी पक्षालाच सभागृहाचे कामकाज चालविण्यात रस नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कामकाज चालू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. अरुणाचल प्रदेशमधील सरकार कशा पद्धतीने अडचणीत आणण्यात आले हे आम्हाला माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.
उत्तराखंडचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर चर्चा करता येणार नाही, अशी भूमिका सरकारतर्फे मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेत मांडली. त्याला सर्वच विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. अनेक न्यायप्रविष्ट मुद्द्यांवर सभागृहात चर्चा झाली असल्याचे विरोधकांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी व्हेलमध्ये जमून ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले.