दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यावरून केंद्र  सरकारने घूमजाव केल्याची टीका उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील स्पर्धेला भाजप का घाबरत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
दिल्लीतील आप सरकारला रविवारी १०० दिवस पूर्ण झाले असताना सरकारविरोधात नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या विरोधात संघर्ष सुरू आहे. सरकार दिल्लीकरांसाठी काम करत असून, नागरिक समाधानी असल्याचा दावा शिसोदिया यांनी केला आहे. बदल्यांचा उद्योग जे चालवत होते ते निवृत्तीनंतर आता राजकारण खेळत असून, लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिल्याचे शिसोदिया यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता स्पष्ट केले. माध्यमे चुकीच्या बातम्या पसरवत असल्याची आगपाखड केली.
नायब राज्यपालांना अधिकार देणारी अधिसूचना काढल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या आमदारांनी केंद्रावर टीका केली आहे. संघराज्य रचनेचे उल्लंघन केंद्र करीत असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.

केंद्राने अधिसूचना काढल्याने आम आदमी पक्षाने कायदेशीर दाद मागण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. विधानसभेने जर तसा निर्णय घेतला तर न्यायालयात जाऊ. राज्यपालांच्या माध्यमातून तुम्ही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला डावलू शकत नाही.
-अलका लांबा, आपच्या आमदार

‘केजरीवालांची मनमानी’
दिल्लीत अरविंद केजरीवाल मनमानी करून सरकार चालवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यांच्या पहिल्या शंभर दिवसांत समन्वयापेक्षा संघर्षच अधिक दिसला अशी टीका दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केली आहे. आश्वासने पूर्ण करण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला.  पहिल्या शंभर दिवसांत केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रत्येक संस्थेमध्ये दोष दिसले अशी टीकाही उपाध्याय यांनी केली.