पन्नीरसेल्वम यांची खजिनदारपदावरून हकालपट्टी; द्रमुकवर आरोप

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के.शशिकला यांना पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. बंडाचा झेंडा फडकावणारे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम एकाकी पडले आहेत. मात्र शशिकला यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यावरून अजूनही संभ्रम आहे.

पन्नीरसेल्वम यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शशिकला यांनी पक्षाच्या मुख्यालयात आमदारांची बैठक बोलावली होती. नंतर या आमदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. राज्यपालांनी शशिकला यांना शपथ देण्यास विलंब लावला तर राष्ट्रपतींच्या पुढे आमदारांना नेण्याची अण्णा द्रमुकची योजना आहे. शशिकला यांनी आपल्या भाषणात पन्नीरसेल्वम यांचा उल्लेख विश्वासघातकी असा केला.

तसेच पक्षाच्या खजिनदारपदावरून त्यांची हकालपट्टी केली. पन्नीरसेल्वम यांनी द्रमुकशी हातमिळवणी केल्याचा आरोप शशिकला यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली पाहता संशय बळावत असल्याचा दावा शशिकलांनी केला. मात्र अशा कृत्यांनी पक्षात फूट पडणार नाही असा दावा शशिकलांनी केला. सरकार अस्थिर करण्याचा द्रमुकचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

द्रमुकने आरोप फेटाळले

अण्णा द्रमुकमधील वाद पाहता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकच्या नेत्यांनी मात्र शशिकलांचे आरोप फेटाळले. अण्णा द्रमुकच्या अंतर्गत वादाशी आमचा काही संबंध नाही, असे द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपद बळकावण्यात यश येत नसल्यानेच त्या आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर स्टॅलिन यांनी दिले आहे.

जयललितांच्या मृत्यूची चौकशी

बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पन्नीरसेल्वम यांनी केला. तसेच जयललितांवरील उपचार व मृत्यूची चौकशी करण्याची आयोगाची घोषणा पन्नीरसेल्वम यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकरवी ही चौकशी केली जाणार आहे. तसेच द्रमुक किंवा भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप पन्नीरसेल्वम यांनी फेटाळला. लोकसभा उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनीही सर्व १३४ आमदार शशिकला यांच्या मागे असल्याचे स्पष्ट केले.

 

तामिळनाडूतील राजकीय घडामोडींचे मुंबईतील राजभवन केंद्रिबदू!

मुंबई : तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुकमधील पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यातील सत्तासंघर्षांमुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील राजभवन हे बुधवारी दिवसभर घडामोडींचे केंद्रबिंदू होते. तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे सी. विद्यासागर राव हे उद्या दुपारी चेन्नईत दाखल होत असून नंतर तेथील राजकीय घडामोडींना वेग येईल.

दबावामुळे राजीनामा दिल्याचा दावा काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी केल्यावर तामिळनाडूमधील राजकीय घडामोडींना वेग आला. अण्णा द्रमुक  विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शशिकला यांची निवड करण्यात आली असली तरी महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव हे राजकीय घडामोडी सुरू झाल्यापासून चेन्नईत दाखल झाले नव्हते. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचे सूतोवाच केल्याने राज्यपालांनी थांबा आणि वाट बघा अशी भूमिका घेतली आहे. कारण शशिकला या प्रकरणात एक आरोपी आहेत. दुसरीकडे शशिकला यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी लवकर पार पडावा म्हणून अण्णा द्रमुकचा दबाव होता.

विद्यासागर राव हे दिवसभर मुंबईतील राजभवनात होते. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींबाबत ते माहिती घेत होते. कायदेशीर सल्लाही त्यांनी घेतला. उद्या दुपारी राज्यपाल चेन्नईला रवाना होणार असल्याचे राजभवनच्या सूत्राकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसारच विद्यासागर राव यांनी आतापर्यंत पावले टाकली आहेत. चेन्नईत गेल्यावर ते काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्याशी चर्चा करतील. याशिवाय शशिकला किंवा अण्णा द्रमुकच्या वतीने नवा नेते निवडीचे पत्र त्यांना सादर केले जाईल. त्यानंतरच राज्यपाल केंद्राशी सल्लामसलत करून निर्णय घेतील.