देशात करोना लसीकरणाची समांतर यंत्रणाही गरजेची असून तीन-चार प्रकारच्या करोनाप्रतिबंधक लशी खुल्या बाजारात आल्या तर संपूर्ण लोकसंख्येचे कमीत कमी वेळेत लसीकरण होऊ शकेल. लशींचे पर्याय असतील तर लोकांना निवडीचे स्वातंत्र्य राहील व सरकारवरील अवलंबत्वही कमी होऊ शकेल, असा युक्तिवाद वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक शेखर मांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

पुढील आठवडय़ापासून लसीकरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून करोनायोद्धय़ांना लशीची मात्रा केंद्र सरकारकडून मोफत दिली जाईल. संपूर्ण लोकसंख्येसाठी मोफत लसीकरण करण्याबाबत केंद्राने अजून धोरण स्पष्ट केलेले नाही. सीरम संस्थेकडून उत्पादित होणारी ‘कोव्हिशिल्ड’ व भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या लशींना औषध नियंत्रक संस्थेने मान्यता दिली आहे.

बहुराष्ट्रीय औषध कंपनी फायझरनेही मान्यतेसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे खुल्या बाजारात लशींचे पर्याय लोकांसाठी उपलब्ध असतील. ‘फायझरच्या लशीला अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मान्यता मिळालेली असून तिथे लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. या कंपनीने संशोधनाची माहितीही जाहीर केलेली असल्याने भारतात फायझरच्या लशीलाही मान्यता दिली जाऊ शकते’, असे मांडे यांनी सांगितले.

मोठय़ा शहरांत उपलब्धता

फायझरची लस उणे ७० अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित ठेवावी लागेल. मॉडर्नाची लस सहा महिने उणे २० अंश सेल्सिअस आणि २ ते ८ अंश सेल्सिअसला एक महिना ठेवता येईल. त्यासाठी मोठय़ा शहरांमध्ये आरोग्यसुविधा असल्याने दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा शहरांमध्ये फायझरची लशी लोकांना मिळू शकतात. मॉडर्ना कंपनीने अजून देशी लस उत्पादक कंपनीशी करार केलेला नसल्याने ती भारतात उपलब्ध होण्यास थोडा वेळ लागू शकतो, असे मांडे म्हणाले.

किंमत किती?

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्राने ‘कोव्हिशिल्ड’च्या लशीची खरेदी केली आहे. ही लस खुल्या बाजारातही मिळू लागेल. फायझर आणि मॉडर्ना या परदेशी कंपन्यांची लसही असेल. ‘अमेरिकेत फायझरची लस २०-२५ डॉलरला मिळते. भारतात त्याची किंमत २ हजार ते २५०० रुपये असेल असा अंदाज आहे. आर्थिकदृष्टय़ा शक्य असेल तर लोकांना अन्य लशींचाही वापर करता येईल’, असे मत मांडे यांनी मांडले. फायझरने अजून किंमत जाहीर केलेली नाही. फायझर वा मॉडर्नापेक्षा कोव्हिशिल्डची किंमत तुलनेत कमी असेल. सीरम संस्था केंद्र सरकारसाठी तीन ते चार मात्रांची लस सुमारे ३०० रुपयांत देणार असून खुल्या बाजारात लशीची किंमत ४५० ते ६०० रुपये असेल. केंद्र सरकारला लस पुरवल्यानंतर ती खुल्या बाजारात उपलब्ध होईल.