करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठा धोका असल्याचा इशारा देण्यात आल्याने १२ वर्षांपर्यंत मुले असणाऱ्या मातांना प्राधान्याने लस देण्यात येणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.

राज्यात गुरुवारपासून दररोज सरासरी ४ लाख लोकांचे लसीकरण करण्याचेही निश्चित केले असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेत संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आम्ही तिसऱ्या लाटेकडे अधिक लक्ष देत आहोत. त्यातूनच ज्या महिलांची मुले ० ते १२ या वयोगटातील आहेत त्यांना प्राधान्याने लस देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मातेकडून मुलांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती राहणार नाही. सरकारी तसेच खासगी रुग्णालयात महिलांसाठी २६ हजार खाटा तसेच वैद्यकीय सुविधा आरक्षित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

आतापर्यंत राज्यात दोन कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्याने तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या तयारीची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ९० दिवस ते १२ वर्षे वयोगटातील करोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी १० हजारहून अधिक खाटा निश्चित केल्या आहेत. तसेच ‘एसएनसीयू’ (स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट)मध्ये २० टक्के जागा करोनाचा संसर्ग झालेल्या १ ते ९० दिवसांच्या बालकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, बुधवारी पश्चिम बंगालमध्ये ३८ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण १७,४७५ जणांचा मृत्यू झाला, तर आणखी १९२५ जणांना करोनाची बाधा झाल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १४ लाख ८७ हजार ३६३ इतकी झाली आहे. राज्यात २२ हजार ३७८ सक्रिय रुग्ण आहेत.