वाराणसीमधील उड्डाणपुल दुर्घटना ही मंदिर पाडल्यामुळेच झाल्याचे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी केले आहे. स्थानिकांच्या हवाल्याने त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राज बब्बर हे बुधवारी आले होते. त्यांनी या दुर्घटनेतील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. या अपघातामुळे निराश झाल्याचेही त्यांनी म्हटले.

वाराणसी येथे मंगळवारी सांयकाळी सुमारे ५ वाचून ४५ मिनिटांनी केंट रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता. मागील तीन वर्षांपासून याचे काम सुरू होते. या दुर्घटनेत १८ जणांचा बळी गेला होता तर २५ जण जखमी झाले होते. अपघातातील काही जखमींची स्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी दुख: व्यक्त करत उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना ५-५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती.

याप्रकरणी बब्बर म्हणाले, मला सांगण्यात आले की, निवडणुकीपूर्वी उड्डाणपुलाचे काम होण्यासाठी तीन विनायक मंदिर पाडण्यात आले होते. हे मंदिर पाडल्यामुळेच ही दुर्घटना झाल्याची लोकांची धारणा असल्याचे त्यांनी मला सांगितले. काही काँग्रेस नेत्यांच्या मते या दुर्घटनेची जबाबदारी जितकी अधिकाऱ्यांची आहे. तितकीच मंत्र्यांचीही होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे.

मृतांच्या नातेवाईकांना दिली जाणारी पाच लाखांची भरपाई कमी असल्याचे बब्बर यांनी म्हटले. पीडित कुटुंबीयांना ५० लाख रूपये देण्याची मागणी त्यांनी केली. एकीकडे इतकी मोठी दुर्घटना झाली होती. तिकडे पंतप्रधान मोदी हे विजयोत्सव साजरा करत होते, अशी टीकाही त्यांनी केली.