काँग्रेसने दाखल केला सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यावरुन टीका होत असताना उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी मात्र आपला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दाखल झालेला सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी फेटाळून लावला होता. या प्रस्तावाला काँग्रेससह सात विरोधी पक्षांचा पाठिंबा होता.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर गैरवर्तणूक व अधिकारांचा गैरवापर असे दोन प्रमुख आरोप ठेवून काँग्रेस व इतर सहा विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन महाभियोगाची नोटीस दिली होती. या नोटिशीवर ६४ खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग या पक्षांचा प्रस्तावाला पाठिंबा होता.

या प्रस्तावावर व्यंकय्या नायडू यांनी दिवसभरात विविध कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल, कायदेतज्ज्ञ के परासरन, लोकसभेचे माजी सचिव सुभाष कश्यप, कायदा मंत्रालयाचे माजी सचिव पी के मल्होत्रा आदींशी त्यांनी चर्चाही केली होती.

मात्र वैंकय्या नायडू यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर काँग्रेससह शिवसेनेनेही प्रस्ताव अशाप्रकारे फेटाळून लावणं चुकीचं असल्याची टीका केली होती. काँग्रेसने याआधीच प्रस्ताव फेटाळून लावल्यास आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं सांगितलं होतं.