24 November 2017

News Flash

गुजरातच्या निवडणुकीत महिलांना अत्यल्प स्थान

गुजरात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महिला उमेदवारांना अत्यल्प स्थान मिळाल्याचे दिसत आहे. काँग्रेसने भाजपच्या

पीटीआय, अहमदाबाद | Updated: November 29, 2012 4:57 AM

गुजरात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महिला उमेदवारांना अत्यल्प स्थान मिळाल्याचे दिसत आहे. काँग्रेसने भाजपच्या तुलनेत कमी महिलांना उमेदवारी दिली आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांत होत असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठी १३ डिसेंबरला मतदान होत आहे. सौराष्ट्र, दक्षिण गुजरात येथे ८७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी केवळ १६ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यातील ११ महिला उमेदवार भाजपच्या तर पाच उमेदवार काँग्रेसच्या आहेत. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड करून गुजरात परिवर्तन पार्टी हा नवा पक्ष स्थापन करणारे केशुभाई पटेल यांनी केवळ एका महिलेला उमेदवारी दिली आहे.
गुजरात विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक गौरांग जानी यांनी सांगितले की, ‘गुजरातच्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये राजकारणाबाबत अतिशय कमी जागरूकता आहे, सध्या राजकारणात स्थिरस्थावर झालेल्या यशस्वी महिला लोकप्रतिनिधींनाच पुन्हा उमेदवारी देण्याकडे सर्व पक्षांचा कल आहे. महिलांमध्ये राजकीय जागृती करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे’.
 ‘त्यांना विधेयक मंजूर करू दे’
गुजरातमध्ये भाजपची प्रदीर्घ काळ सत्ता असल्याने तुमच्या पक्षाने अधिकाधिक महिलांना उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा करणे गैर नाही का, असे विचारले असता, प्रदेश भाजपचे प्रसिद्धीप्रमुख जगदीश भावसार यांनी सांगितले की, महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे धोरण आमच्या पक्षाने मान्य केले आहे, हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आमचा पक्ष तातडीने त्याची अंमलबजावणी करेल, मात्र ज्या पक्षाची अध्यक्षा एक महिला आहे, त्याच सत्ताधाऱ्यांना हे विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यात अद्याप यश आलेले नाही.   

First Published on November 29, 2012 4:57 am

Web Title: very less ladies candidates in gujrat election