केरळच्या समकालीन नाटय़सृष्टीतील संगीत आकृतिबंधात अभिजात व लोकसंगीताची सांगड घालणारे कलाकार कावलम पणीकर (वय ८८)  यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदामणी व गायक मुलगा कावलम श्रीकुमार असा परिवार आहे. काहीकाळ त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. वृद्धापकाळामुळे त्यांना काही आजार होते. बहुमुखी प्रतिभा असलेले पणीकर हे गीतकार, कवी, दिग्दर्शक होते.पणीकर यांच्या नाटकांवर पाश्चिमात्य प्रभाव अजिबात नव्हता व त्यांनी वेगळी नाटय़ प्रशिक्षण व्यवस्था भारतीय परिप्रेक्षातून उभी केली होती. त्यांची कथनशैली अस्सल भारतीय होती. त्याला ग्रामीण बाज होता.  अवनावन कदंबा, दैवथर व साक्षी ही त्यांची नाटके समकालीन मल्याळी नाटय़सृष्टीत गाजली. त्यांना पद्मभूषणने २००७ मध्ये गौरवण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक विद्यावृत्ती, केरळ राज्य चित्रपट उत्कृष्ट गीतकार पुरस्कार असे मानसन्मान त्यांना मिळाले.