राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करण्याची मागणी केल्यापासून अयोध्येमधल्या वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला आहे. मागच्या आठवडयात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी ही मागणी केली होती. कारसेवकपूरम येथे येणाऱ्या यात्रेकरु आणि पर्यटकांचे स्थानिक पूजारी आणि भक्तगण सुस्वर राम भजनाने स्वागत करत आहेत.

रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याचा आपल्या बाजूने सकारात्मक निकाल लागेल अशी संघ परिवाराला आशा आहे. विश्व हिंदू परिषदेने मंदिर बांधकामाची जोरात तयारी सुरु केली आहे. २९ ऑक्टोंबरपासून सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होणार आहे. कायदेशीर अडथळा दूर झाल्यानंतर तीन मजली भव्य राम मंदिर उभारण्याची योजना आहे. मंदिराच्या बांधकामासाठी ७० ट्रक भरुन दगड मागवले आहेत असा दावा अयोध्येथील विहिपच्या नेत्यांनी केला.

मंदिरातील खांबांवर कोरीव नक्षीकामासाठी आणखी कलाकारांना नियुक्त करण्याचा विचार आहे. रामजन्मभूमी मंदिर निर्माण कार्यशाळेवर विहिपचे वरिष्ठ नेते आणि रामजन्मभूमी न्यासाचे बारीक लक्ष आहे. मंदिर निर्माणाचे काम अधिक वेगाने करण्यासाठी दगड आणि कारागीरांना आणले जाईल असे विहिपचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी सांगितले. आम्ही माघार घेणार नाही. ही सत्याच्या विजयासाठी लढाई आहे. आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत असे राय यांनी सांगितले. अयोध्येत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून रामजन्मभूमीकडे जाणारा रस्ता सर्वसामान्यांसाठी बंद आहे.