डॉक्टर आणि परिचारिका रुग्णालयातच गरबा खेळत असल्याचा प्रकार गुजरातमध्ये उघडकीस आला आहे. अहमदाबादच्या सोला सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर आणि परिचारिका गरबा खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाची दखल घेत गुजरातचे आरोग्य मंत्री नितीन पटेल यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
नितीन पटेल यांच्या हस्ते सोमवारी सोला सिव्हिल रुग्णालयाच्या हेमोडायलिसिस विभागाचे उदघाटन करण्यात आले होते. उदघाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर याच रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱयांनी नवरात्रीच्या निमित्ताने रुग्णांसमोरच गरबा खेळण्यास सुरूवात केली. या संपूर्णप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर टीका होण्यास सुरूवात झाली. पटेल यांनी या प्रकरणाची दखल घेऊन रुग्णालयाच्या प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.