डोकलाम प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विजय केशव गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. दोन वर्षांसाठी गोखले हा पदभार सांभाळतील.

विजय गोखले हे १९८१ च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी आहेत. गोखले यांनी दिल्ली विद्यापीठातील इतिहास विषयात एमए केले आहे. गोखले यांनी हाँगकाँग, बीजिंग आणि न्यूयॉर्कमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी परराष्ट्र खात्यात उपसचिव (अर्थ), संचालक (चीन व पूर्व आशिया, सहसचिव (पूर्व आशिया) आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

गोखले यांनी मलेशियात जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. तर ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ या कालावधीत ते जर्मनीत भारताचे राजदूत होते. चिनी भाषाच नव्हे तर तेथील राजनैतिक व्यवहारांची त्यांना माहिती आहे. कारण त्यांनी तिथे आधी काम केलेले आहे. जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत ते चीनमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांनी डोकलाम प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांचा विवाह वंदना गोखले यांच्याशी झालेला असून त्यांना एक मुलगा आहे

पाकिस्तान आणि चीन या शेजारी राष्ट्रांसोबत तणावपूर्ण संबंध हे त्यांच्यासमोरील आव्हान असेल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॅलेस्टाईन, यूएई आणि ओमान हा दौरा देखील गोखले यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. सोमवारी एस. जयशंकर यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. विजय गोखले यांच्या आधी १९७९ ते १९८२ या कालावधीत पुण्याचे राम साठे हे देशाचे परराष्ट्र सचिव होते. त्यांच्यानंतर एका मराठी माणसाला दुसऱ्यांदा परराष्ट्र सचिव होण्याचा मान मिळाला आहे.