स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयला ९००० हजार कोटींचा चुना लाऊन देशातून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबत लंडनच्या कोर्टात खटला दाखल आहे. याबाबत आज सुनावणी होत असून यासाठी मल्ल्या देखील कोर्टात हजर झाला आहे.

दरम्यान, जर आजच्या सुनावणीत लंडनच्या उच्च न्यायालयाने मल्ल्याला अपील करण्याची परवानगी दिली नाही तर येत्या काही दिवसात मल्ल्याला भारताच्या स्वाधीन केले जाईल. त्याने १४ फेब्रुवारी रोजी आपल्या प्रत्यार्पणाचे अपील फोटाळून लावण्यासाठी कोर्टात एक लिखित याचिका सादर केली होती. ही याचिका कोर्टाने ५ एप्रिल रोजी फेटाळून लावली होती. त्यानंतर त्याने ११ एप्रिल रोजी प्रत्यार्पणप्रकरणी तोंडी सुनावणीसाठी अर्ज केला होता. यासाठी त्याला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, न्या. लेगट आणि न्या. पॉपपवेल यांच्या स्थानिक वेळेनुसार, मंगळवारी सकाळी १०.३० वाजेपासून सुरु होणाऱ्या चार तासांच्या वेळेत या प्रकरणी सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर त्याला पुन्हा अपील करण्याची सूट देण्यात आली तर पूर्ण अपीलाच्या सुनावणीला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आज सुनावणीदरम्यान मल्या कोर्टात आपली बाजू मांडताना कोर्टाला हे समजावण्याचा प्रयत्न करणार की, जिल्हा न्यायाधीश आपले प्रकरण राज्य सचिवांकडे पाठवण्याची चूक करीत आहेत.

मल्याने ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांच्यामार्फत त्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर सह्या करण्याविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी मागितली आहे. भारतीय स्टेट बँकेची ९,००० कोटी रुपयांची फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मल्याला भारताच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी मागणी भारताने लंडन सरकारकडे केली आहे. आपल्या पहिल्याच अर्जाद्वारे अपील करण्याची सूट मिळण्याबाबतचा खटला मल्ल्या ब्रिटनच्या उच्च न्यायालयात हारला आहे. त्यानंतर आज त्याच्या नव्या अर्जावर तोंडी सुनावणी होणार आहे.