चांद्रयान २ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलेल्या विक्रम लँडरचा शोध घेण्याची शेवटची आशा धुसर झाली आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या ऑर्बिटरला विक्रम लँडरचा शोध लागलेला नाही. विक्रम लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरला ते ठिकाण नासाच्या ऑर्बिटरच्या क्षेत्रात नसल्याने ऑर्बिटरने काढलेल्या फोटोंमध्ये लँडर दिसत नसल्याची प्राथमिक शक्यता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने व्यक्त केली आहे.

‘नासा’चे लुनार रिकन्सेन्स ऑर्बिटर (एलआरओ) हे मागील १० वर्षांपासून चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. मंगळवारी हे ऑर्बिटर विक्रम लँडर ज्या भागात उतरले त्या भागावरुन गेले. मात्र या ऑर्बिटरच्या कॅमेराच्या कक्षेत विक्रम लँडर उतरलेला चंद्राचा पृष्ठभाग आला नाही. त्यामुळेच विक्रम लँडरचे फोटो मिळण्याची अपेक्षा भंग झाली आहे. ‘एलआरओवरील कॅमेरांनी विक्रम लँडर ज्या भागात उतरणार होते त्या परिसराचे फोटो काढले. मात्र त्यामधून विक्रम लँडर नक्की कुठे आहे हे समजू शकलेले नाही. विक्रम लँडर या एलआरओवरील कॅमेराच्या कक्षेबाहेर असलेल्या भागामध्ये असल्याची शक्यता आहे,’ असे मत नासाच्या ग्रह विज्ञान विभागाच्या प्रवक्त्या जोशुआ हँडाल यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्वकांशी चांद्रयान २ मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृ्ष्ठभागावर उतरणे अपेक्षित होते. मात्र चंद्रावर हे लँडर उतरण्याच्या काही मिनिट आधी त्याचा इस्रोशी संपर्क तुटला. एलआरओ हा नासाचा ऑर्बिटर चंद्राच्या त्या पृष्ठभागावरुन १७ तारखेला गेला. त्यावेळी या ऑर्बिटरने काढलेले फोटो आणि पूर्वी याच भागाचे नासाच्या रेकॉर्डमध्ये असलेले फोटो जुळवून पाहिले जाणार आहेत. यामाध्यमातून त्या भागामध्ये विक्रम लँडर आहे की नाही हे नासा तपासून पाहणार आहे. या फोटोंचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतरच यासंदर्भातील अधिकृत माहिती नासा प्रसिद्ध करणार आहे.

‘एलआरओ’ १७ तारखेला विक्रम लँडर जिथे उतरणे अपेक्षित होता त्या भागावरुन गेला. यावेळी त्या भागात संध्याकाळचा संधीप्रकाश होता. त्यामुळे तेथील बराचसा भाग धूरकट दिसत होता. कादाचित विक्रम लँडर याच भागात असेल,’ अशी शक्यता हँडाल यांनी व्यक्त केली आहे.

एलआरओच्या आत्ताच्या फेरीमध्ये विक्रम लँडरचे फोटो काढली जाण्याची शक्यता कमी असल्याचे मत तज्ज्ञांनी आधीच व्यक्त केले होते. आता नासाचा हा ऑर्बिटर १४ ऑक्टोबर रोजी याच पृष्ठभागावरुन जाणार आहे. त्यावेळी या भागात दिवस असणार आहे. त्यामुळेच तेव्हा काढण्यात येणाऱ्या फोटोंमध्ये विक्रम लँडरचा शोध लागू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. इस्रोच्या नियोजित वेळापत्रकानुसार विक्रम लँडर केवळ १४ दिवस काम करणार होते. म्हणजे २१ सप्टेंबरनंतर विक्रम लँडरचा संशोधनासाठी काहीच उपयोग होणार नाही. विक्रम लँडर उतरलेल्या भागामध्ये लवकरच रात्र सुरु होणार आहे. त्यावेळी येथील तापमान उणे १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाते. विक्रम लँडरने चंद्रावर दिवस असताना सर्व संसोधन करणे अपेक्षित होते. मात्र संपर्क तुटल्याने विक्रम लँडरच्या माध्यमातून कोणतेच संशोधन करण्यात इस्रोला अद्याप यश आले नाही. त्यामुळेच चंद्रावरील या भागात रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस होईपर्यंत विक्रम लँडर निषक्रिय होण्याची शक्यता जास्त असून त्यानंतर पुन्हा त्याच्याशी कधीच संपर्क होऊ शकणार नाही.

नासाच्या एलआरओच्या मदतीने इस्रोला विक्रम लँडरशी संपर्क करता येणार नसला तरी लँडरचे नक्की काय झाले याबद्दलची माहिती मिळणार होती. मात्र ते फोटो अद्याप नासाने जारी केलेले नाहीत.