जॉन हॅम यांना उत्तम सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा तर व्हायोला डेव्हीस यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा एमी पुरस्कार येथील शानदार समारंभात प्रदान करण्यात आला. गेली आठ वर्षे हा पुरस्कार त्यांना हुलकावणी देत होता. डॉन ड्रेपर यांच्या ‘मॅड मेन’ या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिकाची भूमिका केली होती. ४४ वर्षांचे जॉन हॅम यांना लागोपाठ आठव्यांदा नामांकन मिळाले होते. त्यांना २०१५ या वर्षांसाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हॅम यांनी हा पुरस्कार स्वीकारताना गमतीने सांगितले की, निवड मंडळाची नक्कीच काहीतरी चूक झाली असावी. पण पुरस्काराचे श्रेय आमचे वेशभूषाकार, लेखक, इतर सहकारी यांना आहे, येथे आपण हा पुरस्कार स्वीकारतो आहे यावर खरेच विश्वास बसत नाही.
हॅम यांना प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली. त्यांनी त्यांची मैत्रीण जेनीफर वेस्टफेल्ट हिचे आभार मानले. ते १८ वर्षांनंतर तिच्यापासून अलीकडेच वेगळे झाले आहेत. व्हायोला डेव्हिस यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, त्या हा पुरस्कार मिळालेल्या पहिल्या आफ्रिकी अमेरिकन आहेत. ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ या टीव्ही शो मधील पीटर डिंकलेज यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ला वर्षांत १२ पुरस्कार मिळाले आहेत. डेव्हीड बेनिऑफ व डी बी वेल यांना मालिकेच्या उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे, तर डेव्हीड नटर यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. एचबीओच्या ‘व्हीप’ या मालिकेला चार पुरस्कार मिळाले आहेत. ज्युलिया लुईस ड्रेफस यांना लागोपाठ चौथ्यांदा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून टोनी हेल यांना गौरवण्यात आले. तर उत्कृष्ट अभिनेता म्हणून जेफ्री टॅमबोर यांना गौरवण्यात आले. ही राजकीय दूरचित्रवाणी मालिका असून ती विनोदी स्वरूपाची आहे. ‘ऑरेंज इज द न्यू ब्लॅक’ मालिकेसाठी उझो अडुबा यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘मॉम’ या विनोदी मालिकेतील भूमिकेसाठी अ‍ॅलिसन जॅने यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. एचबीओच्या ‘ऑलिव्ह किटरिज’ या मालिकेसाठी बिल मरे यांना उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय इतर तीन पुरस्कार मिळाले.