दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा वाद उफळाला आहे. जेएनयूएसयू विद्यार्थी संघटनेने दावा केला आहे की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांवर हल्ला घडवला आहे. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिला देखील मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

“माझ्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने गुंडांनी हल्ला केला, माझ्या नाकातोंडातून रक्त येत आहे. मी बोलण्याच्या देखील स्थितीत नाही.” असं जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष म्हणाली आहे.

जेएनयूएसयू ने दावा केला आहे की, साबरमती व अन्य वस्तीगृहात अभाविपने प्रवेश करत विद्यार्थ्यांना मारहाण केली.याचबरोबर अभाविपकडून दगडफेक व तोडफोड देखील करण्यात आली. तोडफोड करण्यात आलेल्यांचे चेहरे झाकलेले होते.

डाव्या संघटनांचे कार्यकर्ते व जेएनयूचे शिक्षक शुल्क वाढीच्या मुद्यावरून आंदोलन करत असताना, ही हाणामारीची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून मला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रुरपणे हल्ला केला गेला आहे. पोलिसांना तातडीने ही हिंसा थांबावी व शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल? , असं मुख्यमंत्री केजरीवील यांनी या घटनेबद्दल ट्विट केलं आहे.

तर, याप्रकरणी अभाविपने म्हटले आहे की, जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांवर डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांसह एसएफआय, डीएसएफशी निगडीत असलेल्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात जवळपास १५ विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर, साधारण ११ विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे याबाबत अस्पष्टता आहे. विविध वस्तीगृहांमधील अभाविपशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला असून, डाव्या विद्यार्थी संघटनांकडून वस्तीगृहांची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे.