करोनाच्या संकटातही काशीची उर्जा, भक्ती आणि शक्ती यांच्यात काहीही बदल झाला नाही. सगळ्या विश्वाला बळ देणारी काशी आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वाराणसीमध्ये त्यांनी देव दिवाळीचा उत्सव साजरा केला. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकलचा नारा दिला. यावेळी दिवाळी जशी स्थानिक भेट वस्तूंना महत्त्व देऊन साजरी केली गेली अगदी तशीच पावलं आपल्याला यापुढेही उचलायची आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काशीच्या विकासासाठी जेव्हा आम्ही पावलं उचलली तेव्हा फक्त विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी विरोध दर्शवला. मात्र आम्ही त्या विरोधाची पर्वा केली नाही. अनेक गोष्टी विरोधकांनी केल्या. मात्र महादेवाच्या कृपेने काशीला जुनं वैभव प्राप्त होतं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

काशीतले नागरिक हे देवाचं रुप आहे कारण ही देवाची भूमी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच प्रयागराज, काशी, अयोध्या या ठिकाणी विकास होतो आहे. काही लोकांच्या पोटात दुखतं आहे मात्र त्या विरोधाला न जुमानता या तिन्ही ठिकाणी विकास करतो आहोत. प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं ही आपली सगळ्यांची इच्छा होती त्या मंदिराच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वेश्वराची पूजा करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतल्या नागरिकांना संबोधित केलं. काशी ही संपूर्ण जगाला प्रकाश देणारी नगरी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे. करोनाच्या काळात आपल्या देशाने आत्मनिर्भर भारत ही मोहीम राबवली फक्त राबवलीच नाही तर यशस्वी करुनही दाखवली त्यामुळे मला आपल्या देशवासीयांचा अभिमान आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.