‘इंटरकनेक्शन’ आकारणीची रक्कम न भरल्याबद्दल ‘लूप मोबाइल’च्या मुंबईतील ग्राहकांना व्होडाफोनने २४ तास कोंडीत पकडल्यानंतर अखेर लूपशी दिलजमाई केली. आपल्या नेटवर्कमधून ‘इनकमिंग कॉल्स’ घेण्यास सोमवारी तसेच मंगळवारी मज्जाव केला होता. त्यामुळे अनेकांनी सहज संपर्क होऊ न शकल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही कारवाई मागे घेतली बिलांविषयी परस्पर सहकार्याने एक करार झाल्याचे दोन्ही कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ट्रायच्या नियमांनुसार, एक मोबाइल कंपनी आपल्या नेटवर्कवरून ग्राहकाला ‘आऊटगोइंग कॉल’च्या बदल्यात दुसऱ्या मोबाइल कंपनीकडून मिळणारी ‘इनकमिंग कॉल’ची सुविधा मिळवून देत असते. यासाठी त्या कंपनीला काही रक्कम अदा करावी लागते. सध्या या सुविधेसाठी मिनिटाला दहा पैसे मोजावे लागतात. पैसे न भरल्याबद्दल लूप मोबाइलवरून व्होडाफोनच्या नेटवर्कवर येणारे ‘इनकमिंग कॉल’ आम्ही काही काळासाठी रोखले आहेत, असे ‘व्होडाफोन इंडिया’च्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून लूपने आमची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळेच कारवाईचे पाऊल उचलावे लागले आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. परंतु ही रक्कम किती आहे, याचा अधिक तपशील देण्यास नकार दिला. याप्रकरणी लूप मोबाइलशी संपर्क साधला असता हा तिढा सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, असे सांगितले.

आपले म्हणा..
व्होडाफोन सध्या मुंबईतील सर्वाधिक ग्राहक असलेली मोबाइल कंपनी आहे. लूप मोबाइल सर्व मालमत्ता भारती एअरटेलकडे हस्तांतरित केली जात आहे. गेल्या फेब्रुवारीत एअरटेलने लूपशी धोरणात्मक करार केला होता. यासाठी एअरटेलने सात हजार कोटी रुपये मोजले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लूपची मुंबईतील ग्राहकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे या कोंडीतून सुटण्यासाठी लूपने आता एअरटेलने आपलेसे करावे, अशी आशा ग्राहकांनी मनी बाळगावी असे सूचित केल्याचे बोलले जात आहे.