जम्मू काश्मीर येथील सुंजवान येथे लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याला एक महिना पूर्ण व्हायच्या आत लष्कराने हल्ल्याच्या मास्टरमाइंडला ठार केले. सुरक्षा दल आणि लष्करासाठी हे मोठे यश मानले जाते आहे. पुलवामा येथील अवंतिपोरा भागात झालेल्या चकमकीत लष्कराच्या ५० राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत सुंजवान हल्ल्याचा मास्टरमाइंड मुफ्ती वकास या ठार केले. जैश ए मोहम्मदचा कमांडर मुफ्ती वकासला ठार करण्यात आले आहे अशी माहिती काश्मीरचे आयजी एस. पी. पानी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. मुफ्ती वकास हा विदेशी दहशतवादी होता असेही त्यांनी सांगितले.

१० फेब्रुवारीला सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे ६ जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे जैश-ए मोहम्मदचा कमांडर वकास याचा हात होता. त्याला आज अखेर ठार करण्यात आले आहे. लष्कर आणि सुरक्षा दलाचे हे मोठे यश मानले जाते आहे.