अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य केलेला नसतानाच वॉशिंग्टनमध्ये त्यांचे समर्थक व विरोधक यांच्यात तुंबळ धुमश्चक्री झाली. ट्रम्प समर्थकांनी मतदान व मोजणीतील गैरप्रकारांच्या संदर्भात निषेध मोर्चा काढला होता. तो आधी शांततेत पार पडल्यानंतर रात्री हिंसाचार झाला. ‘दी मिलीयन मेगामार्च’(मॅगा) या नावाने हा मोर्चा काढण्यात आला होता.

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन विजयी होऊन आठवडा उलटला तरी ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नसून  ३ नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षपदाचे मतदान झाले होते. शनिवारी हा मोर्चा शांततेत पार पडला पण नंतर ट्रम्प समर्थक व विरोधक यांच्यात रात्रीच्या वेळी हिंसाचार झाला. ‘व्हाइट हाऊस’पासून जवळच ट्रम्प समर्थक व विरोधक एकमेकांना भिडले.  विशीतील एक व्यक्ती यात गंभीर जखमी झाली असून ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या चळवळीशी संबंधित तो एक निदर्शक होता. त्याला पाठीत भोसकण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन पोलीस अधिकारीही चकमकीत जखमी झाले आहेत. काही मिनिटे ही चकमक सुरू होती. दोन गटांच्या हातात लाठय़ाकाठय़ा  होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीपर्यंत ते मागे हटायला तयार नव्हते.

ट्रम्प यांनी शनिवारी व्हर्जिनियातील एका उपनगरात गोल्फ खेळण्यासाठी जात असताना चाहत्यांना अभिवादन केले होते. नंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर असा आरोप केला की, ‘‘वृत्तवाहिन्या आमचे समर्थक प्रचंड  संख्येने जमलेले असताना ते दाखवत नाहीत. मॅगा; मोर्चासाठी  हजारो लोक आले आहेत. वाहिन्यांनी मात्र रिकामे रस्ते दाखवले. आम्हाला मोठा पाठिंबा मिळत आहे हे प्रसारमाध्यमे लपवित आहेत.’’

फ्रीडम प्लाझा येथून ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मोर्चा सुरू झाला त्यांनी ‘फोर मोअर इयर्स’, ‘स्टॉप टू स्टील’ अशा घोषणा दिल्या. ट्रम्प समर्थकांनी लाल टोप्या घातल्या होत्या. त्यांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ फलकही झळकावले. ‘अँटिफा’च्या लोकांनी आमच्या समर्थकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हिसका दाखवताच ते पळायला लागले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘अँटिफा’चे लोक हल्ला करण्यासाठी मोर्चा संपण्याची संधी शोधत होते. पण नंतर ते घाबरट असल्याने पळाले, कारण आमच्या लोकांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प समर्थकांची घोषणाबाजी

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ म्हणजे ‘मॅगा’ मोर्चासाठी हजारो लोक अमेरिकेच्या विविध भागातून वॉशिंग्टनमध्ये आले होते. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. ट्रम्प यांनी अजून पराभव मान्य केला नसून बायडेन यांनी वारंवार त्यांच्याकडे मतदान व मतमोजणीतील गैरप्रकारांच्या पुराव्यांची मागणी करूनही ट्रम्प यांना ते देता आले नाहीत.

अंडीफेक ते गुद्दागुद्दी

फॉक्स न्यूजने म्हटले आहे की, ट्रम्प विरोधक निदर्शकांनी ट्रम्प समर्थकांवर अंडी फेकून मारली. त्यांचे ध्वज, टोप्या, फलक हिसकावून ते पेटवून दिले. काहींनी एकमेकांना गुद्दे मारले तर काहींनी एकमेकांच्या मुस्कटात मारायला कमी केले नाही. ट्रम्प विरोधकांनी ट्रम्प समर्थकांचा मुक्काम असलेल्या हॉटेलवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला.

ट्रम्प यांचा माध्यमांवर शत्रुत्वाचा आरोप

ट्रम्प यांनी माध्यमांवर टीका करताना म्हटले आहे की, वॉशिंग्टनमध्ये हजारो लोक रिपब्लिकन पक्षाच्या समर्थनासाठी जमले होते. पण माध्यमे आमचे शत्रू असल्याने त्यांनी ही गर्दी दाखवण्याचे टाळले. ज्यांनी या समर्थकांवर हल्ले केले त्यांच्यावर आता कारवाई सुरू झाली आहे.