ऑस्ट्रेलियात ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या भारतीय महिलेला प्रवासादरम्यान वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. दोन अल्पवयीन मुलींनी त्या महिलेला शिवीगाळ केली. शेवटी तीन महिला प्रवाशी त्या भारतीय महिलेच्या मदतीला धावल्याने शिवीगाळ करणाऱ्या मुलींना माघार घ्यावी लागली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून ऑस्ट्रेलियात भारतीयांवरील हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या  मिला (वय ६६) या मंगळवारी मेलबर्नला ट्रेनने जात होत्या. या दरम्यान, त्यांना वारंवार खोकला येत होता. त्यांच्या बाजूच्या आसनावर बसलेल्या दोन अल्पवयीन मुली त्यांच्याकडे बघत होत्या. ‘माझ्याकडे बघून त्यांच्यात कुजबूज सुरु होती. मी त्यांना हटकले असता त्या दोघींनी मला शिवीगाळ केली’, असे मिला यांनी सांगितले. तुमच्या देशात परत जा, हा आमचा देश आहे, असे त्या मुलींनी मिला यांना सुनावले. तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगत मिला यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यानंतरही दोघींची बडबड सुरु असल्याचे व्हिडिओत दिसते.

शेवटी ट्रेनमधील तीन महिला प्रवाशी मिला यांच्या मदतीला धावल्या. त्यांनी ट्रेनमधील आपातकालीन बटण दाबले आणि त्या तिघीही मिला यांच्या शेजारी जाऊन बसल्या. मिला यांच्यावर वर्णद्वेषी टीका करणाऱ्या दोन्ही मुली ट्रेनमधून खाली उतरेपर्यंत त्या तिघीही मिला यांच्या शेजारी बसून होत्या. त्या दोन मुलींना कसलेही भान नव्हते, अत्यंत आक्षेपार्ह भाषेत बोलत होत्या. म्हणूनच आम्ही मिला यांच्या बाजूला जाऊन बसलो, असे पॅट्रीशिया बोनर यांनी सांगितले. त्यांनीच घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्याने हा प्रकार उघड झाला.