केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नाही, असं स्पष्टीकरण माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

भाजपाच्या नेत्यांकडून अनेकदा भाषणामध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा देशात विभाजन घडवण्याचा डाव आहे अशी टीका केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये २०१६ साली झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर भाजपाच्या नेत्यांकडून ‘तुकडे तुकडे गँग’ हा उल्लेख वरचे वर होऊ लागला. याचसंदर्भात गोखले यांनी महिती अधिकार हक्काअंतर्गत अर्ज करुन ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल सरकारकडे असणारी माहिती उघड करावी अशी मागणी केली होती. याच अर्जाला आलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत गोखले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशणा साधला आहे.

“केंद्रीय गृहमंत्रालयाने मी केलेल्या आरटीआय अर्जाला उत्तर दिले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं या उत्तरामध्ये म्हटलं आहे. म्हणजेच तुकडे तुकडे गँग अस्तित्वात नाही. ती केवळ अमित शाह यांच्या संकल्पनेत आहे,” असे ट्विट गोखले यांनी केलं आहे.

अमित शाह हे राजकीय भाषणांमध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा उल्लेख करतात यासंदर्भात निवडणुक आयोगाने दखल घ्यावी यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे गोखले सांगतात. “सभा आणि भाषणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री हे शब्द का वापरतात हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे किंवा लोकांसमोर खोटं बोलल्याबद्दल आणि त्यांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागायला हवी,” असं गोखलेंनी म्हटलं आहे.

६ जानेवारी रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “मी जेव्हा जेएनयूमध्ये होतो तेव्हा तिथे तुकडे तुकडे गँग नव्हती,” असं मत व्यक्त केलं होतं. जेएनयूमध्ये मुखवटे घातलेल्या काही गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली येथील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये जयशंकर यांनी हे मत व्यक्त केलं होतं.

२६ डिसेंबर रोजी दिल्लीमधील एका प्रचारसभेमध्ये अमित शाह यांनी “सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशभरात होणाऱ्या आंदोलनासाठी काँग्रेस आणि ‘तुकडे तुकडे गँग’ कारणीभूत आहे,” असं मत व्यक्त केलं होतं.