करोनासारखं संकट आपण कधी ऐकलंही नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. सध्या निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व आहे. मात्र थकणं, हरणं, तुटून जाणं हे आपल्याला मंजूर नाही. सतर्क राहून या युद्धाचा सामना करायचा आहे. आपल्याला जीव वाचावायचाही आहे आणि पुढे जायचं आहे. आपल्याला आपला संकल्प अजून बळकट करावा लागेल असंही मोदींनी म्हटलं आहे. आपला संकल्प संकटापेक्षा विराट असला पाहिजे. असंही मोदींनी म्हटलं आहे. आज त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

करोनाच्या संकटाचा सामना करताना जगाला चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला आहे. जगभरात पावणेतीन लाखांच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. भारतातही अनेक कुटुंबीयांनी त्यांच्या माणसांना गमावलं आहे. एका व्हायरसने जगभरात थैमान घातलं आणि जगभरातल्या कोट्यवधी लोक संकटाचा सामना करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच त्यांनी देशाला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

२१ वं शतक हे भारताचं आहे हे आपण गेल्या शतकभरापासून ऐकत आलो आहे. करोना संकटामुळे जगभरात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याकडे भारताचं पूर्ण लक्ष आहे. जगभरात ४२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं. जगभरात जी स्थिती निर्माण झाली आहे त्यातून आपल्याला शिकवण काय घ्यायची आहे? तर आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. आज आपण अशा एका वळवणार उभे आहोत की जे वळण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या संकटातही भारतासाठी एक संधी दडली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्ण विश्वाची चिंता असंही मोदींनी स्पष्ट केलं. भारतात जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा एकही पीपीई किट भारत तयार करत नव्हता. सध्याच्या घडीला भारत रोज २ लाख पीपीई किटची निर्मिती करतो आहे. ही बाब अत्यंत अभिमानाची आहे. करोनाच्या संकटात आपल्याला एक संधी दिसते आहे. आपण जर ठरवलं तर कोणताही मार्ग आपल्यासाठी खडतर नाही. आपण सगळे सर्वोत्तम आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कालच सगळ्या देशाच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं.