भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करत त्यांना मिठी मारण्याची भीती वाटते असे म्हटले आहे. शुक्रवारी म्हणजेच २० जुलैला राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर त्यांच्या भाषणाएवढीच चर्चा या गळाभेटीचीही झाली. मात्र भाजपाने राहुल गांधी यांच्या गळाभेटीवर टीका करणे अजूनही सोडलेले नाही. आम्हाला राहुल गांधी यांची गळाभेट घेण्याची भीती वाटते, कारण आमचे लग्न झाले आहे. राहुल गांधींची गळाभेट घेतली तर पत्नी घटस्फोट देईल असे वाटते. पत्नी म्हणेल की तुमची लक्षणे ठीक दिसत नाही म्हणून अशी गळाभेट घेता, असे वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे लग्न अद्याप झालेले नाही. त्यामुळे भाजपा खासदारांना असे वाटते की राहुल गांधी यांची गळाभेट घेतली आणि उद्या त्यांनी आमच्यावर केस केली तर? सुप्रीम कोर्टाने अजून कलम ३७७ ला मान्यता दिलेली नाही. राहुल गांधी यांनी आधी लग्न करावे त्यानंतरच आम्ही त्यांची गळाभेट घेऊ असाही टोला दुबे यांनी लगावला.

मागील शुक्रवारी म्हणजेच २० जुलैला अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता. त्यानंतर लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाषण केले. या भाषणात ते म्हटले की भाजपाने माझा कितीही तिरस्कार केला, मला पप्पू समजले तरीही मी त्यांच्या विरोधात नाही. एवढेच नाही तर भाषण संपल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागेवर जाऊन त्यांची गळाभेट घेतली. या गळाभेटीची चर्चा चांगलीच रंगली होती. आता या गळाभेटीवर निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांची गळाभेट घेतली तर पत्नी घटस्फोट देईल असे वाटते अशी प्रतिक्रिया दिली आहे.