राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं देण्यात आली असून यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानसोबत चर्चा कऱण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. एकीकडे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा केली जाऊ नये अशी मागणी होत असताना राष्ट्रवादीने मात्र पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा चर्चेला वाट मोकळी करुन देऊ असं आश्वासन दिलं आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीचे महासचिव डी पी त्रिपाठी यांनी सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी चर्चा करणं गरजेचं असल्याचं म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात परराष्ट्र धोरणासंबंधी आपली भूमिका जाहीर केली आहे. जाहीरनाम्यात लिहिण्यात आलं आहे की, आम्ही पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा चर्चेला मोकळी वाट करुन देऊ आणि त्यात दहशतवाद हा मुख्य मुद्दा असेल. यासोबतच चीनसोबत किमान संबंध टिकवून ठेवणे गरजेचं असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तसंच सातत्याने शस्त्रपुरवठा कऱणे आणि सध्याच्या उपकरणांची देखभाल यासाठी साह्य पुरवणाऱ्या रशियासोबत संबंधी पुनरुज्जीवित करणं आवश्यक असल्याचंही म्हटलं आहे.

चीनसंबंधी आपली भूमिकाही राष्ट्रवादीने स्पष्ट केली आहे. ‘चीनसाठी आम्ही चर्चेचे सर्व मार्ग खुले ठेवू. मात्र त्यांनी भारतीय औषधे, कृषी उत्पादने आणि आयटी सेवांसाठी आपली बाजारपेठ खुली करावी अशी आमची मागणी असेल’, असं राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात लिहिलं आहे.

राष्ट्रवादीने राष्ट्री सुरक्षेवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. युपीए सरकारच्या दुसऱ्या कारकीर्दीत युद्धविरामाचे जितक्या वेळा उल्लंघन झाले त्याच्या तब्बल सहा पट गेल्या पाच वर्षांत झाले. युपीए सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या तुलनेत आता दुप्पट दहशतवादी हल्ले झाले. इतकंच नाही तर मागील पाच वर्षात आपण दुप्पट सैनिक गमावलेत अशी टीका राष्ट्रवादीने केला आहे. युपीएच्या काळात भारतात शांततापूर्ण वातावरण होते आणि कमी मनुष्यहानी होत होती. मात्र आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एनडीए सरकारने ही शांतता भंग केली अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will start conversation with pakistan ncp in manifesto
First published on: 25-03-2019 at 18:30 IST