गुजरातमधील नरोडा पाटिया येथे २००२ मध्ये उसळलेल्या दंगली प्रकरणी गुजरात हायकोर्ट आज (शुक्रवारी) निकाल देणार आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ३२ जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांचा देखील समावेश असून त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. देशभरात खळबळ उडवून देणारे हे प्रकरण नेमके आहे तरी काय याचा घेतलेला हा आढावा…

नेमके काय झाले नरोडा पाटियात?
अहमदाबाद शहराच्या सीमेवर असलेल्या नरोडा पाटिया उपनगरात गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत ९७ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. यात ३३ जण जखमी झाले होते.

कधी घडली घटना?
२८ फेब्रुवारी २००२ रोजी हा नरसंहार झाला होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळल्याने कारसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने २८ फेब्रवुारी रोजी बंदची हाक दिली. याच दिवशी जमावाने नरोडा पाटीयातील मुस्लिमांच्या वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात ९७ जणांची हत्या करण्यात आली.

विशेष न्यायालयाचा निर्णय काय?
विशेष न्यायालयाने २९ ऑगस्ट २०१२ मध्ये या प्रकरणात निकाल दिला होता. भाजपाच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह ३२ जणांना दोषी ठरवले होते. त्यांच्यावर कट आखणे, तसेच हत्या, हत्येचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले. न्यायालयाने २९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. माया कोडनानी यांच्यासह ३० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोडनानी यांना २८ वर्षे तर मुख्य आरोपी बाबू बजरंगीला उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावे लागणार होते.

गुजरात हायकोर्टात ११ याचिका
नरोडा पाटिया हिंसाचाराप्रकरणी गुजरात हायकोर्टात एकूण ११ याचिका दाखल झाल्या. दोषी ठरलेले, सुप्रीम कोर्टाने नेमलेले विशेष तपास पथक (एसआयटी) तसेच पीडितांचे कुटुंबीय यांनी या याचिका दाखल केल्या होत्या. एसआयटीने दोषींची शिक्षा वाढवण्याची तसेच सात आरोपींच्या सुटकेला आव्हान दिले आहे.