यादीमध्ये काय आहे? त्याला स्वीसलीक्स असे का म्हटले जाते?
जगभरातील एचएसबीसीच्या एक लाख खातेदारांची ही यादी आहे. जीनिव्हामधील शाखेत खाते असलेल्या प्रत्येक खातदाराचे नाव आणि इतर माहिती त्यामध्ये आहे. एकूण २०३ देशांमधील खातेदारांची नावे त्यात आहेत. त्यातील शिल्लक आहे १०२.०५ अब्ज डॉलर. ही शिल्लक २००६-०७ या आर्थिक वर्षातील आहे.
यादीमध्ये भारतीय किती?
यादीमध्ये एकूण १६८८ नावे भारतीय आहेत. राष्ट्रीयत्व, जन्मठिकाण, पत्ता यांच्या आधारावर ही संख्या मोजण्यात आली आहे. तीन महिन्यांच्या शोधानंतर आणि छाननीनंतर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने ही यादी ११९५ पर्यंत खाली आणली. यादीतील उर्वरित नावे खोटी असून, काही खातेदार स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात स्थायिक झाले आहेत.
यादी कोणी मिळवली आणि कोठून?
मूळ यादी पॅरिसस्थित वृत्तपत्र ‘ला मॉंड’च्या पत्रकारांनी फ्रान्स सरकारमधील त्यांच्या सूत्रांकडून मिळवली. पण यादीमध्ये जगभरातील विविध खातेदारांची नावे असल्यामुळे ‘ला मॉंड’ने वॉशिंग्टनस्थित ‘इंटरनॅशनल कॉन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट’ (आयसीआयजे) यांच्याशी करार केला. ‘आयसीआयजे’ने जगभरातील ४५ देशांमधील १४० पत्रकारांशी करार करून त्यांच्याकडे ही माहिती दिली. भारतात ‘द इंडियन एक्स्प्रेस’सोबत हा करार करण्यात आला. ‘आयसीआयजे’नेच यासंबंधीचे वृत्त जगभरात ९ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्याचे निश्चित केले होते.
‘इंडियन एक्स्प्रेस’ची यामध्ये भूमिका काय होती?
गेल्या तीन महिन्यांपासून ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या कार्यकारी संपादक रितू सरिन आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली पत्रकारांचा गट आयसीआयजेकडून पुरविण्यात आलेल्या माहितीची आणि यादीतील नावांची छाननी करीत होते. ‘एक्स्प्रेस’च्या पत्रकारांच्या चमूने यादीतील माहितीच्या आधारे पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू आणि इतर शहरांमध्ये पत्त्यांची व इतर माहितीची शहानिशा केली.
ही सर्व खाती काळ्या पैशांची आहेत का?
असे थेटपणे म्हणता येणार नाही. कारण या खातेदारांनी परदेशात खाते उघडण्याआधी आवश्यक परवानगी घेतलेली असू शकते. त्याचबरोबर या खात्यांमधील शिल्लकीबद्दल त्यांनी प्राप्तिकर विभागाला माहितीही दिलेली असू शकते. ज्या खातेदारांनी याबद्दल केंद्र सरकारला माहिती दिलेली नाही. त्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
एचएसबीसीतील या खातेधारकांकडून किती कर आत्तापर्यंत गोळा करण्यात आला आहे?
गेल्या महिन्यापर्यंत, परदेशातील या खात्यांमध्ये ३१५० कोटी रुपये शिल्लक असल्याचे थेट कर संकलन अधिकाऱयांचे म्हणणे आहे. या रकमेवर कर आकारण्यात आला आहे.
‘एचएसबीसी’तील भारतीय खातेधारकांची संख्या दुप्पट, राणे, ठाकरे यांच्या कुटुबियांचीही खाती