अ‍ॅपल फोनची संकेतावली एफबीआयने उघड केल्याच्या पार्श्वभूमीवर वॉट्सअॅपने आपल्या एक अब्ज यूजर्सच्या वॉट्सअॅप मेसेजेससाठीच्या सेटिंग्जची संकेतावली अधिक सक्षम केली असून, त्यामुळे वॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठविण्यात येणारे संदेश केवळ पाठविणाऱ्याला आणि प्राप्त होणाऱ्यालाच वाचता येणार आहे. यूजर्सच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता जोपासण्याच्या दृष्टिने टाकण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
सॅन बेर्नार्दिनो येथे झालेल्या हल्ल्यात संबंधित हल्लेखोर दहशतवादी दाम्पत्याच्या घरात सापडलेल्या अ‍ॅपल फोनची संकेतावली एफबीआयने उघड केली असून, थोडक्यात त्या फोनचे माहिती मिळवण्यासाठी हॅकिंग करण्यात आले. यात अ‍ॅपल कंपनीची मदत घेण्यात आलेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वॉट्सअॅपकडून संकेतावलीबद्दल माहिती देण्यात आली.
दोन वर्षांपूर्वीच वॉट्सअॅपकडून संकेतावली अधिक सक्षम करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. ज्यामध्ये संदेश पाठविणारा व्यक्ती आणि संदेश प्राप्त होणाऱ्या व्यक्तीलाच तो संदेश वाचता येईल. २०१४ मध्ये केवळ दोनच व्यक्तींमध्ये होणारी संदेशांची देवाणघेवाण याच पद्धतीने दोघांपुरती गोपनीय ठेवण्याला सुरुवात झाली. पण जे संदेश व्यक्तींच्या समूहामध्ये पाठवले जातात आणि ज्यामध्ये फोटो आणि व्हिडिओंचा वापर केलेला असतो. त्याची संकेतावली तुलनेत इतरांना वाचता येऊ शकेल, अशी होती. पण आजघडीला वॉट्सअॅपची संपूर्ण संकेतावली पूर्णपणे सक्षम करण्यात आली असून, यूजर्समध्ये होणारी संदेशांची देवाण घेवाण ही फक्त त्यांनाच वाचता येण्यासारखी आहे. खुद्द कंपनीलाही हे संदेश वाचता येण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्याचबरोबर सरकारलाही हे संदेश वाचता येऊ शकणार नाहीत.
वॉट्सअॅपने त्यांच्या अधिकृत ब्लॉगवरून याबद्दल माहिती दिली. सायबर गुन्हेगार, हॅकर्स, सरकारी अधिकारी आणि आम्ही सुद्धा यूजर्सचे संदेश वाचू शकणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. अॅंड्राईड आणि आयफोन या दोन्ही युजर्सना याचा फायदा होणार आहे.