नवी दिल्ली : व्हॉटसअ‍ॅप व इन्स्टाग्रामची सेवा शुक्रवारी रात्री काही काळ खंडित झाली होती, ती पुन्हा लगेचच सुरू झाली आहे. अनेक व्हॉटसअ‍ॅप वापरकर्ते त्यामुळे संदेश पाठवू शकले नव्हते. इन्स्टाग्रामही काही काळ बंद होते. व्हॉटस अ‍ॅप व इन्स्टाग्रामची सेवा बंद पडल्याचे डाऊन डिटेक्टर पोर्टलने स्पष्ट केले.

फेसबुकची ही दोन्ही उपयोजने असून तांत्रिक कारणास्तव ही सेवा बंद पडल्याचे कारण देण्यात आले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, की तांत्रिक कारणास्तव ट्विटर व फेसबुकची सेवा काही काळाकरिता बंद पडली होती. आम्ही ती समस्या  दूर केली असून आता व्हॉटसअ‍ॅप व इन्स्टाग्राम ही उपयोजने पुन्हा सुरू झाली आहेत. ग्राहकांची जी गैरसोय झाली त्याबाबत आम्ही दिलगीर आहोत.

४५ मिनिटे व्यत्यय

व्हॉटसअ‍ॅपने ट्विटरवर म्हटले आहे, की ग्राहकांच्या संयमाची आम्ही दाद देतो कारण किमान ४५ मिनिटे या सेवा बंद होत्या, त्यानंतर त्या पुन्हा सुरू झाल्या. काही लोकांना इन्स्टाग्राम खात्यावर काम करता आले नाही. काहींना व्हॉटसअ‍ॅप संदेश पाठवण्यात अडचणी आल्या. पण ते सगळे तांत्रिक कारणास्तव झाले होते. नंतर सर्व सेवा पूर्ववत झाल्या असून इन्स्टाग्राम व ट्विटर सेवेत नंतर कुठलाही अडथळा आला नाही.