आजच्या तरूण पिढीची मुलभूत गरज बनलेले व्हॉट्स अॅपची आता नव्या वैशिष्ट्यांसह अपग्रेड होणार आहे. व्हॉट्स अॅपची च्या नव्या व्हर्जनमध्ये तुम्ही एखादे छायाचित्र स्क्रिबल करू शकणार आहात, तसेच या छायाचित्रांमध्ये वापरकर्त्यांना स्टिकर्सचाही उपयोग करता येणार आहे. सध्या व्हॉट्स अॅपचे हे व्हर्जन अँड्रॉईड मोबाईल फोन्ससाठी उपलब्ध असून लवकरच आयओएसवरही ते उपलब्ध होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयओएस १० ही प्रणाली वापरणाऱ्यांना लवकरच सिरीच्या माध्यमातून मेसेजस आणि व्हॉईस कॉल्स करता येणार आहेत. याशिवाय, आयओएस २.१६.१० मध्ये व्हिडिओ कॉल्स आणि जीआयएफ सपोर्ट उपलब्ध होणार आहे. व्हॉट्स अॅपच्या या नव्या सुविधांची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी लवकरच हे फिचर्स लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय, व्हॉट्स अॅप कॅमेऱ्यामध्ये फ्रंट फेसिंग फ्लॅश आणि वन फिंगर व्हिडिओ झूम ही दोन नवी वैशिष्ट्ये उपलब्ध होणार आहेत.

व्हॉट्स अॅपची नवी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

स्क्रिबल– व्हॉटस अॅपच्या या नव्या साधनामुळे वापरकर्त्यांना एखादे छायाचित्र क्रॉप करता येईल. तसेच या छायाचित्रात स्टिकर्सही लावता येणार आहेत. याशिवाय, व्हॉटस अॅप कॅमेऱ्याने एखादे छायाचित्र काढल्यानंतर त्या छायाचित्रात स्क्रिबलही करता येणार आहे. अँड्रॉईड बेटा व्हर्जनवर या सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय, नव्या व्हर्जनमध्ये विविध साईन्स, डायलॉग बलुन्स आणि इमोजीचा समावेश असणाऱ्या नवे स्टिकर्सही मोठ्याप्रमाणात मिळणार आहेत. छायाचित्र क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांना या नव्या सुविधांचा उपयोग करता येणार आहे. छायाचित्र स्क्रिबल करण्यासाठी कलर पॅलेट आणि पेन्सिलचा ऑप्शनही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

फ्रंट फेसिंग फ्लॅश– फ्रंट फेसिंग फ्लॅश या नव्या सुविधामुळे व्हॉटस अॅप कॅमेऱ्यातून अधिक चांगल्याप्रकारे छायाचित्रे काढता येणार आहेत. कमी प्रकाशात चांगली छायाचित्रे काढण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुतेक स्मार्टफोन्ससाठी ही सुविधा उपलब्ध असून त्यामुळे अंधारात छायाचित्र काढताना मदत होणार आहे.

सिरी, व्हिडिओ कॉल्स आणि जीआयएफ सपोर्ट–  व्हॉटस अॅपकडून आयओएस १० या प्रणालीला सिरीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना अॅपल व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंटच्या माध्यमातून मेसेजेस आणि व्हॉईस कॉल्स करता येणार आहेत. ट्विटरवरच्या माहितीनुसार, व्हॉटस अॅप बेटा इन्फो अकाउंटच्या माध्यमातून वापरकर्त्यांना लॉकस्क्रीनवरूनच व्हॉटस अॅपच्या मेसेजला रिप्लाय देता येणार आहे. त्यासाठी कॉटॅन्क्टसमध्ये कॉलिंग आणि मेसेज पाठविण्यासाठी व्हॉटस अॅप हे नवे बटण उपलब्ध होणार आहे. याशिवाय, व्हॉटस अॅपकडून आयओएस प्रणालीसाठी जीआयएफ (GIF) सपोर्ट उपलब्ध करून देणार असल्याचीही चर्चा आहे.