जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केले. भारतानं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी जगाला सांगितंल.

मोदी म्हणाले, “भारतानं जर कोणाला मैत्रीचा हात दिला तर त्याचा अर्थ तो कधीच तिसऱ्या देशाच्या विरोधात आहे असा होत नाही. भारत जेव्हा विकासाचं सहकार्य कायम ठेवतो त्यावेळी त्याच्यामागे कोणत्यातरी सहकारी देशाला बळजबरी करण्याचा विचार नसतो. आम्ही आमच्या विकासाच्या प्रवासात मिळालेला अनुभव शेअर करायलाही मागेपुढे पाहत नाही”

“भारतानं कायम विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं आहे. भारत एक असा देश आहे ज्याने आपले ५० शूर जवान जगातील विविध शांतता मोहिमेवर पाठवले आहेत. भारताने कायम संपूर्ण मानव जातीच्या हिताचा विचार केला आहे. भारतानं आपला स्वार्थ पाहिला नाही, भारताची धोरणं कायम याने प्रेरित राहिली आहेत. महामारीच्या या कठीण काळातही भारताची फार्मा इंडस्ट्रीने १५० पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली आहेत”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

पुढच्या वर्षी जानेवारीपासून भारत सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्य म्हणून देखील आपली जबाबदारी निभावेल. जगातील अनेक देशांनी भारतावर जो विश्वास दाखवला आहे. मी त्यासाठी सर्व देशांचे आभार मानतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या जाबाबदारीचे दर्शन जगाला घडवले.