देशात विविध क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असल्याची चर्चा होत आहे. मात्र, भारतीय परदेशवारीसाठी विक्रमी पैसा खर्च करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशात मंदी कुठेय? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, विदेशवारीवर चलन खर्चाच्या बाबतीत भारतीयांचा उच्चांक गाठला आहे.

आरबीआयने उदारीकरण केलेल्या रेमिटन्स योजनेंतर्गत माहिती एकत्र करण्यास सुरूवात केल्यापासून जून २०१९ मध्ये परदेशी प्रवासावर भारतीयांनी ५८६ दशलक्ष डॉलर इतका प्रचंड पैसा खर्च केला आहे. भारतीयांकडून एकूण परकीय चलन खर्च वाढत असताना परदेशी सहलींवरील खर्चही आणखी वाढत चालला आहे, एकूण खर्चातील याचा मोठा वाटा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

यावर्षी जूनमधील प्रवासातील खर्च हा भारतीय व्यक्तींनी खरेदी केलेल्या परदेशी खरेदीच्या ४२ टक्के इतका होता. आर्थिक वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीत देशाचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा खर्च हा १५९४ दशलक्ष डॉलर इतका होता. जो एप्रिल ते जून २०१९ मध्ये भारतीयांनी खरेदी केलेल्या वस्तूंच्या एकूण ४१८१ दशलक्ष डॉलर खर्चापैकी होता. एक वर्षापूर्वी एप्रिल-जून २०१८ मध्ये प्रवासाचा खर्च हा एक अब्ज डॉलर इतका होता. जो एकूण खर्च ३ अब्ज डॉलरपैकी होता.

आरबीआय विविध विभागांमार्फत डॉलरच्या किरकोळ खरेदीचे वर्गीकरण करते, यामध्ये प्रवास, शिक्षण, मालमत्ता खरेदी, भेटवस्तू, गुंतवणूक आणि जवळच्या नातेवाईकांची देखभाल आदींचा समावेश असतो. यामध्ये दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक कॅटेगिरी ही शिक्षण आहे. उदारीकरणाची रेमिटन्स योजना २००४ मध्ये सुरू करण्यात आली होती आणि त्यावेळी भारतीयांना दरवर्षी २५,००० डॉलर्सपर्यंत खर्च करण्याची मुभा होती. ही मर्यादा कालांतराने वाढत गेली आणि आता ती प्रति व्यक्ती अडीज लाख डॉलर्स प्रतिव्यक्ती इतकी झाली. यामध्ये जुगार आणि भारतीय गुंतवणूक वगळता परिवर्तनीय रोखे यांचा समावेश नाही कारण हे पैसे कोणत्याही चुकीच्या कारणासाठी वापरले जाऊ शकतात.

एक वर्षापूर्वी, जून २०१८ पर्यंत १ अब्ज डॉलर्सच्या एकूण खर्चापैकी ३८१ दशलक्ष डॉलर परदेशी प्रवासाचा खर्च होता जो एकूण खर्चापैकी ३७ टक्के होता. यामध्ये शिक्षणासाठीच्या खर्चाचा (२५ टक्के) समावेश आहे. यामध्ये जरी शिक्षणाचा वाटा कायम असला तरी अंशतः कामावरील निर्बंधांमुळे यूएस आणि यूकेमधील व्हिसा आणि रुपया मजबूत होत असल्याने याचे प्रमाण वाढले आहे. जागतिक पर्यटन संघटनेच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये विदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या ५ कोटी इतकी होती. जी सन २०१७ मध्ये परदेशात जाणाऱ्या २.४ कोटी लोकांच्या तुलनेत दुप्पट आहे.