भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लोकप्रिय आहेच मात्र दुःखद बाब ही आहे की पक्षात इतर लोकांना बाजूला सारण्यात आले आहे. हे वक्तव्य केले आहे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर या संदर्भातले ट्विट केले आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच स्वामी यांनी मोदी सरकारचे कामकाज आणि सरकारचे आर्थिक धोरण यावर टीका केली आहे.

अशात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही ट्विट करून सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. जीडीपीचे आकडे जेव्हा समोर आले तेव्हा ही या आकड्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे वक्तव्य स्वामी यांनी केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली नव्हती. गेल्या महिन्यात झालेल्या एका मुलाखतीत ते म्हटले होते की पंतप्रधान माझे खूप चांगले मित्र आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही म्हणतात त्यामध्ये पक्षाचे हित असते. त्यांचे म्हणणे भाजपामध्ये लगेच मान्य होत नाही उलट ४-५ महिन्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले जाते असेही स्वामी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते. सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत मात्र भाजपात इतरांना स्थान नाही असे म्हटले. ज्यानंतर ट्विटरवर त्यांना नेटकऱ्यांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली.

भाजपात इतर लोकप्रिय नेते असते तर २००४ आणि २००९ च्या निवडणुका हरण्याची वेळ भाजपावर आली नसती असे उत्तर एका नेटकऱ्याने दिले आहे. तर नरेंद्र मोदी यांना देशाचे हित ठाऊक आहे त्यामुळे २०१९ मध्येही त्यांनाच निवडून द्या असेही आवाहन एका नेटकऱ्याने केले आहे. एका नेटकऱ्याने तर सुब्रमण्यम स्वामींना सल्लाच दिला आहे, तुमच्या सारख्या नेत्याच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. तुम्ही असे बोलणार असाल तर तुमच्यात आणि यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांच्यात काय फरक उरला? असा प्रश्न त्याने विचारला आहे.