चिनी कंपनीने बनवलेले टिक टॉक हे अॅप कमालीचे लोकप्रिय झाले आहे. या अॅपच्या वापरकर्त्यांची संख्या आज एक अब्जच्या घरात आहे. अनेकांना टिक टॉकने ओळख मिळवून दिली आहे. तुमच्याकडे सेलिब्रिटीसारखा लूक असेल किंवा तुमच्यात वाद निर्माण करण्याची क्षमता असेल तर, तुम्ही आपोआपच टिक टॉकवर स्टार बनता. हरिम शाह आणि तिची मैत्रीण सुंदल खट्टक यांनी पाकिस्तानात असेच सेलिब्रिटी स्टेटस मिळवले आहे.

कोण आहे हरिम शाह ?

मागच्या काही दिवसांपासून हरिम शाह या नावाची पाकिस्तानात मोठया प्रमाणावर चर्चा आहे. हरिम शाहचे २१ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स असून लाखोलोक तिचे व्हिडीओ पाहतात. हरिम शाहला मिळालेली लोकप्रियता थक्क करुन सोडणारी आहे. हरिमने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातील व्हिडीओ टिक टॉकवर पोस्ट केल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. तिचा हा व्हिडीओ पाकिस्तानात मोठया प्रमाणावर पाहिला गेला. त्यानंतर एका सर्वसामान्य मुलीला थेट परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात प्रवेश कसा मिळाला ? असा प्रश्न पाकिस्तानात विचारला जात आहे.

एका मुलाखतीमध्ये हरिम शाह कोण आहे? असा प्रश्न तिलाच विचारण्यात आला. त्यावर तिने, “हरिम शाह एक सर्वसामान्य मुलगी आहे, ती तिच्या आयुष्यात जे काही करते ते सर्व सोशल मीडियावर उपलब्ध आहे” असे तिने उत्तर दिले. जीममधल्या वर्कआऊटपासून पार्कमध्ये फिरण्यापर्यंतचे तिचे सर्व व्हिडीओ टिक टॉकवर उपलब्ध आहेत.
हरिम शाह मुळची खैबर पख्तूनख्वा प्रांतातील आहे. पण आता ती इस्लामाबादमध्ये राहते. तिचे आई-वडिल सरकारी नोकरीमध्ये असून तिला तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत. हरिम एम.फिलची विद्यार्थिनी आहे.

वेगवेगळया वादांसोबत नाव जोडले गेल्याने हरिमच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. परराष्ट्र मंत्रालयतील व्हिडीओनंतर तिचा पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हरिम इतक्या शक्तीशाली माणसापर्यंत कशी पोहोचली ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपण इम्रान खान यांना पहिल्यांदा नाही, तर अनेकवेळा भेटलो आहे असे सुद्धा तिने सांगितले.