अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सकाळी ते आणि त्यांची पत्नी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प करोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले. त्याआधी ट्रम्प यांनी विश्वासू सहकारी होप हिक्स यांना करोनाची लागण झाल्यामुळे आपणही करोना चाचणी केल्याचे टि्वट केले होते.

“जराही विश्रांती न घेता, प्रचंड मेहनत घेणाऱ्या होप हिक्स यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे धक्कादायक आहे, फर्स्ट लेडी आणि मी माझ्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत. या दरम्यान आम्ही आमची क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केलीय” असे ट्रम्प यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

क्लीव्हलँड येथे झालेल्या २०२० च्या पहिल्या प्रेसिडेन्शिअल डिबेटसाठी हिक्स यांनी ट्रम्प यांच्यासोबत प्रवास केला होता. होप हिक्स या २०१२ पासून ट्रम्प यांच्यासोबत काम करत आहेत. ट्रम्प यांनी २०१५ साली राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर होप हिक्स यांची प्रेस सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. ‘द प्रिंट’ने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- Feeling Well! करोनामुक्त होऊन लवकरच परतेन- ट्रम्प

कोण आहेत होप हिक्स?
ग्रीनवीच येथे जन्मलेल्या होप हिक्स यांच्याकडे २०१६ साली ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेची महत्त्वाची जबाबदारी होती. त्यावेळी त्या फक्त २६ वर्षांच्या होत्या.

होप हिक्स या खरंतर २०१२ पासून ट्रम्प यांच्यासोबत काम करत आहे. हिल्तझिक स्ट्रॅटजीस या जनसंपर्क कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि फॅशन बिझनेसच्या पीआरचे काम संभाळले. होप हिक्सने ट्रम्प यांची मुलगी इव्हांकाला फॅशन व्यवसायाच्या विस्तारातही मदत केली आहे.

आणखी वाचा- करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाले…

टेक्सासच्या साऊर्थन मेथोडीस्ट विद्यापीठातून त्यांनी ग्रॅज्युएशनची पदवी घेतली. होप हिक्स फारशा चर्चेत नसतात. पण जनसंपर्क क्षेत्रातील गुंतागुंतीची कठिण कामे सहजतेने करण्यात त्या माहिर आहेत. त्याशिवाय प्रशासकीय कौशल्यही त्यांच्याजवळ आहे.

२०१८ साली हिक्स यांनी व्हाइट हाऊसच्या कम्युनिकेशन डायरेक्टर पदाचा राजीनामा देऊन त्या खासगी क्षेत्रातील नोकरीमध्ये रुजू झाल्या होत्या. पण या वर्षाच्या सुरुवातीला त्या पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये परतल्या व डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराची जबाबदारी त्यांना मिळाली. आता त्या डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेराड कुशनर यांना रिपोर्ट करतात.