केंद्रशासित प्रदेश होण्यापूर्वी तत्कालिन जम्मू-काश्मीर राज्यात सत्तेत असताना भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढला होता, त्यामुळे सरकार कोसळलं होतं. भाजपाने सरकारचा पाठिंबा काढून घेत पीडीपीसोबतची युतीही संपुष्टात आणली होती. मात्र, यामागचं नेमकं कारण काय होतं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरसाठी आयुष्यमान भारत योजना लागू केली, यावेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “एक काळ होता जेव्हा आम्ही जम्मू-काश्मीर सरकारचा भाग होतो. पण आम्ही सरकारमधून बाहेर पडत युती तोडली होती. कारण राज्यात पंचायत निवडणुका व्हाव्यात आणि लोकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळावा ही त्यावेळी युती तोडण्यामागची भूमिका होती.”

दरम्यान, नुकत्यात जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास मंडळाच्या (डीडीसी) निवडणूका पार पडल्या. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या जनतेने लोकशाही बळकट करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर या दोन्ही भागांमध्ये मतदान केलं. इथल्या जनतेनं घराबाहेर पडत विकासासाठी मतदान केलं, असंही मोदी यावेळी म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या जनतेला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार

जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत जवळपास २२९ सरकारी रुग्णालये आणि ३५ खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे जम्मू-काश्मीरच्या जनतेला ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत करता येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.