चीनने भारतीय हद्दीत केलेल्या अतिक्रमणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. संरक्षणासाठी जेवढया रक्कमेची तरतूद करण्यात आलीय, त्यावरुन राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. मागच्यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून चीनने पूर्व लडाख सीमेवरील काही भागांमध्ये अतिक्रमण केले आहे. या भागातील चीनच्या दादागिरीवरुन भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष सुद्धा झाला आहे. भारताच्या शूर जवानांनी प्रत्येकवेळी चीनचे आव्हान तितक्याच ताकदीने परतवून लावले आहे.

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी तसेच सैन्य पातळीवर नऊ बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही. पँगाँग सरोवराच्या फिंगर फोरमधून चीन माघार घ्यायला तयार नाहीय. तोचा वादाचा मुख्य मुद्दा आहे. मागच्यावर्षी १५ जूनला गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. पण चीनने ही गोष्ट अजून मान्य केलेली नाही. दरम्यान गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुद्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केले आहे.

“चीनने आपला भूभाग बळकावला आहे. पीआर फोटोसाठी म्हणून पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी सैनिकांसाठी संरक्षणाचे बजेट का वाढवले नाही?” असा सवाल राहुल गांधी यांनी टि्वट करुन विचारला आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत डिफेन्स बजेटमध्ये सात हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मागच्यावर्षी संरक्षणासाठी ४.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.