देशात काही लाख आणि हजार लोकसंख्या असलेल्या इतर धर्मीयांपेक्षा देशावर ६०० वर्षे राज्य करणारा आणि १६ ते १७ कोटी लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज आज भयभीत का आहे? असा सवाल उपस्थित करीत असे भीतीचे वातावरण टाळण्यासाठी देशात सर्व धर्मांमध्ये समन्वयाची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल यांनी व्यक्त केले आहे.

दिल्लीत मुघल बादशाह शाहजहाँचा मुलगा आणि विचारवंत दारा शुकोहवर आधारित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “मी हे विश्वासाने सांगू इच्छितो की, जर दारा शुकोहने भारतावर शासन केले असले तर देशात इस्लाम वाढला असता आणि हिंदू देखील इस्लामला चांगल्या प्रकारे ओळखू शकले असते. मात्र, इस्लामच्या शासकांपैकी एक असलेला औरंगजेब हा क्रूरतेचे प्रतिक होता तर दारा शुकोह सर्वसमावेश विचारांचे प्रतिक होते.”

कृष्ण गोपाल पुढे म्हणाले, “देशात जर कोणत्याही समाजांमध्ये परस्पर अविश्वासाचे आणि भयाचे वातावरण असेल तर चर्चेतून हा प्रश्न सोडवायला हवा. भारताची परंपरा ही कायम सर्वे भवंतु सुखिन: अशी राहिली आहे. त्यामुळे या देशाने कधीही विभाजनवादी धोरणांना आणि विचारांना थारा दिलेला नाही, सर्व पृथ्वी आपलीच मानली आहे. त्यामुळेच पाकिस्तानातील लोक दुःखी रहावेत असे कोणत्याही भारतीयाला आवडणार नाही.”

एका लेखाचा दाखला देताना त्यांनी म्हटले की, “देशात पारशी समाजाची सुमारे ५० हजार, जैन समाजाची ४५ लाख, बौद्ध समाजाची ८०-९० लाख, यहुदी समाजाची ५ हजार लोकसंख्या आहे. या लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण नाही. आपण कधी ऐकलंय की पारसी, जैनांना भीती वाटतेय. मात्र, तुम्ही १६-१७ कोटी लोक आहात तरी तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला नक्की कोणाची भीती वाटते हा मोठा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे, हिंदू समाजानेही लोकांना आपलंस केलं आणि सर्वांना आपल्या घरात प्रेमानं ठेवलं आहे. आपण जर प्रेमाचे धागे शोधले तर तुम्हालाही प्रेम मिळेल.”