फ्रान्समधील व्यंगचित्र साप्ताहिक ‘शार्ली एब्दो’च्या कार्यालयावर झालेला दहशतवादी हल्ला दहशतवादाविरोधात पुकारलेल्या युद्धाची प्रतिक्रिया होती, असे वादग्रस्त विधान करून माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वपक्षाच्याच नेत्यांची कोंडी केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. मात्र अय्यर यांच्या विधानावर सोनिया गांधी यांनीच स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.
ते म्हणाले की, अय्यर राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्या विधानाची जबाबदारी सोनिया गांधी यांनाच घ्यावी लागेल. जम्मू-काश्मिर विधानसभेत  त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर प्रसाद म्हणाले की, जम्मू-काश्मिरमध्ये सत्तास्थापनेसाठी अद्याप कुणाही पक्षाचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे भाजपची भूमिका ‘थांबा व वाट पहा’अशीच आहे. काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी, अय्यर यांनी वैयक्तीक मत नोंदवल्याची प्रतिक्रिया देत सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. सोनिया गांधी यांच्या स्पष्टीकरणाची मागणी करणाऱ्या प्रसाद यांनी केली.