तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात #MeToo चळवळ जोरात सुरु होती. सिनेसृष्टीसह वेगवेगळया क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना #MeToo चळवळीच्या माध्यमातून वाचा फोडली होती. भारतातही त्यावेळी तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे प्रकरण गाजत होते. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. वेगवेगळया क्षेत्रातील स्त्रिया त्यांच्यावर झालेल्या शारीरिक जबरदस्तीच्या घटना #MeToo चळवळीच्या माध्यमातून मांडत होत्या.

त्यावेळी मीडिया क्षेत्रातून प्रिया रमाणी यांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली होती. एम.जे.अकबर त्यावेळी मोदी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री होते. प्रिया रमाणी यांनी केलेल्या आरोपांमुळे मोदी सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला होता. प्रख्यात पत्रकार, लेखक राहिलेल्या एम.जे.अकबर यांनी वृत्तपत्राच्या संपादक पदावर असताना आपल्या बरोबर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप प्रिया रमाणी यांनी केला होता.

एम. जे. अकबर ‘टेलिग्राफ’चे संपादक असताना नोकरी देण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीवळी अकबर यांनी कसा लैंगिक छळ केला याची माहिती सर्वप्रथम प्रिया रमाणी यांनी दिली होती. सुरुवातीला एम.जे.अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या रमाणी एकटया होत्या. पण नंतर #MeToo मोहिमेतंर्गत तब्बल २० महिलांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केले होते. त्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर दहा दिवसांनी अकबर यांनी राजीनामा दिला होता.

‘माझ्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप बनावट आहेत. अशा आरोपांमुळे माझ्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझे वकील या तथ्यहीन आरोपांबाबत कायदेशीर पावले उचलतील’, असा इशाराही त्यांनी दिला होता. यानुसार अकबर यांनी रमाणी यांच्याविरोधात पतियाळा कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता.

न्यायालयाने आजच्या निकालात काय म्हटलं ?
“ज्या ठिकाणी महिलांच्या सन्मान करायला सांगणारे महाभारत आणि रामायण लिहिलं गेलं, तिथे महिलांविरुद्ध अशा घटना घडत असतील तर हे लज्जास्पद आहे. समाजात प्रतिष्ठा असलेला माणूसही लैंगिक शोषण करू शकतो. जे आरोप केले गेले आहेत, ते सामाजिक प्रतिष्ठेला जोडून आहेत. पण लैंगिक अत्याचार आणि शोषणाचा पीडितांवर होणारा परिणाम समाजाने समजून घ्यायला हवा. महिलांना अनेक दशकांनंतरही तक्रार करण्याचा अधिकार आहे,” असं सुनावत न्यायालयाने प्रिया रमाणी यांची मानहानीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.