विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपला एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. नव्वदीच्या दशकात नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया खूप चांगले मित्र होते. या काळात ते संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला एकाच स्कुटरवरून फिरत. मात्र, मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. प्रवीण तोगडिया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोवर आरोप केले. त्यामुळे तोगडियांच्या टीकेचा रोख मोदी सरकारवरच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी विकोपाला पोहोचण्याची शक्यता आहे.

या पाच कारणांमुळे नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडियांमध्ये पडली फूट:-

*संघ परिवार आणि विहिंपच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ मध्ये नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसविण्यात तोगडिया यांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे या दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. ‘अहमदाबाद मिरर’च्या माहितीनुसार, २००२ मध्ये मोदी मुख्यमंत्रीपदी असताना तोगडिया यांनी गृह मंत्रालयाच्या कारभारात मोठ्याप्रमाणावर हस्तक्षेप करायला सुरूवात केली. त्यावेळी मोदींनी तोगडिया यांना गृह मंत्रालयाच्या कारभारात ढवळाढवळ करू नका, असे सुनावले होते. तसेच सर्व अधिकाऱ्यांनाही तशा सूचना देऊन ठेवल्या होत्या.

*मोदींचे सरकार असताना गांधीनगरमध्ये विकास कामांच्यावेळी अनेक मंदिरे तोडण्यात आली होती. त्यावेळी मोदी आणि तोगडिया एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

*२०११ मध्ये तोगडियांनी मोदींच्या सद्भावन यात्रेची खिल्ली उडवली होती. मोदी केवळ स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी हिंदुत्त्वाचा वापर करत असल्याचे तोगडिया यांनी म्हटले होते. त्यानंतच्या काळात मोदी आणि तोगडिया यांच्यातील वितुष्ट वाढतच गेले.

*सूत्रांच्या माहितीनुसार, संघ परिवार आणि भाजपाला तोगडियांच्या हातातून विश्व हिंदू परिषदेची सूत्रे काढून घ्यायची आहेत. जेणेकरून संघाला विहिंपच्या माध्यमातून आपल्या योजना राबवणे शक्य होईल. प्रवीण तोगडिया आणि रेड्डी यांचा विहिंपच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच भुवनेश्वरमध्ये एक बैठकही झाली होती. या बैठकीत रेड्डी यांच्याजागी व्ही. कोकजे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला प्रवीण तोगडियांनी कडाडून विरोध केला.

*आजच्या पत्रकार परिषदेत काही नेत्यांनी आपल्याला संघटनेच्या पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप तोगडिया यांनी केला होता. माझा आवाज दाबण्यासाठी देशभरात माझ्या विरोधात कायदेभंगाच्या केसेस दाखल केल्या जात आहेत. देशभरात माझ्याविरोधात खटले भरवण्यात आले. ज्या केसेस मला ठाऊकही नाहीत त्या जुन्या केसेस उकरून काढत माझे नाव त्यात गोवण्यात आले, असेही तोगडियांनी सांगितले.  सेंट्रल आयबीने माझ्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टरांना घाबवरण्यास सुरुवात केली. ज्याबाबत मी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते, असे सांगत तोगडियांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.