पतीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर तो धक्का सहन न झाल्याने एक महिला काही दिवस पतीच्या मृतदेहासोबत राहत होती. तिने तिच्या नऊ वर्षाच्या मुलीला वडिलांची तब्येत ठिक नसून ते सध्या बेडरुममध्ये आराम करतायत असे सांगितले होते. मध्य दिल्लीच्या कमला मार्केट भागामध्ये हे कुटुंब राहते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

बुधवारी दुपारी या जोडप्याची मुलगी वडिलांना पाहण्यासाठी म्हणून बेडरुममध्ये गेली. त्यावेळी वडिलांच्या तोंडातून रक्त येत असल्याचे तिने पाहिले. तिने वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण शरीर एकदम कडक झालेले होते. तिने तिच्या काकांना याची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती एका सरकारी उपक्रमात सिनियर टेक्निशिअन पदावर कार्यरत होते. त्यांना ह्दयासंबंधीचा आजार होता. पत्नी शाळेमध्ये शिक्षिका आहे.

पोलीस जेव्हा या जोडप्याच्या घरी पोहोचले, तेव्हा सुद्धा पत्नी नवऱ्याचा मृतदेह रुग्णालयात घेऊन जाण्याच्या मार्गमध्ये अडथळे आणत होती. मृतदेहाच्या कडकपणावरुन २४ तास आधी मृत्यू झाला असावा असा डॉक्टरांचा अंदाज आहे. ह्दयविकाराच्या आजारामुळे सोमवारी मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलीस घरी पोहोचले तेव्हा मृतदेह चादरीने झाकलेला होता व पत्नी शेजारी बसली होती. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्यालाही घरात मृत्यू झाल्याची माहिती नव्हती.