इराकच्या संसदेने अमेरिकन सैन्याला देश सोडायला सांगितल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच खवळले आहेत. त्यांनी थेट आक्रमक भूमिका घेत इराकला धमकी दिली आहे. अमेरिकन सैन्याला बगदादचा तळ सोडावा लागला तर, इराकला एअर बेसचा खर्च भरुन द्यावा लागेल अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.

“बगदादमध्ये आमचा सर्वोत्तम, महागडा एअर बेस आहे. मी राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी अब्जावधी डॉलर खर्चून हा बेस बांधण्यात आला आहे. इराक जो पर्यंत त्याची किंमत चुकवणार नाही, तो पर्यंत आम्ही हा बेस सोडणार नाही” असे डोनाल्ड ट्रम्प एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

“अमेरिकन सैन्याला बगदादचा बेस सोडण्यास भाग पाडले, तर इराकवर भयानक निर्बंध लादू. यापूर्वी इराकने कधी पाहिले नसतील असे निर्बंध त्यांच्यावर लादू. इराणवर लादलेले निर्बंध त्यासमोर छोटे वाटतील” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

इराणने काय निर्णय घेतला?
२०१५ मध्ये झालेल्या अण्वस्त्र करारानुसार इंधनाच्या समृद्धीकरणावर निर्बंध होते. त्या निर्बंधांचे पालन न करण्याची भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर कुठल्याही मर्यादा नाहीत ही हसन रौहानी प्रशासनाची भूमिका इराणच्या सरकारी वाहिनीवरुन जाहीर करण्यात आली.

काय होता हा करार?
इराणने अण्वस्त्र विकसित करु नयेत, यासाठी २०१५ साली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेबरोबर हा करार करण्यात आला होता. सुरक्षा परिषदेमध्ये ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने या करारातून एकतर्फी माघार घेतली.