काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी स्वत: राहुल गांधी यांचीही पंतप्रधानपदी विराजमान होण्याची खूप महत्त्वाकांक्षा असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आला आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पंतप्रधानपदासाठी आपली निवड केली तर त्याबाबत आपण निश्चितच विचार करू, असे राहुल यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस पक्षात निवडून आलेले खासदार पंतप्रधानांची निवड करतात. निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास आणि सर्व खासदारांनी आपल्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे राहुल गांधी यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहात का, असा प्रश्न त्यांना वार्ताहरांनी विचारला होता.
विद्यमान पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवडही निवडून आलेल्या खासदारांनी केली आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान निवडण्याची काँग्रेस पक्षात पद्धत नाही. पंतप्रधान निवडण्याचा अधिकार खासदारांचा आहे आणि तो अबाधित ठेवला पाहिजे.