स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोधपूरमधील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आसाराम बापूने डोक्यावर टोपी खाली खेचत डोक्यावर हात ठेवला आणि ढसाढसा रडू लागला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली. वय ७७ वर्षे असलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायालयाने शरद व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ऐकल्यानंतर आपले उर्वरीत आयुष्य तुरुंगातच जाणार याची कल्पना आलेला आसाराम कोर्टात ढसाढसा रडला. पण जेव्हा त्याला न्यायालयाबाहेर आणण्यात आलं तेव्हा एका शिपायाला त्याने जेलमध्ये राहणार, खाणार, पिणार आणि मजा करणार असं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता. शिल्पी व शरदचंद्र यांनी आसारामला या कृष्णकृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यांनाही २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

या खटल्याची सुनावणी १९ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी ती एस.सी.-एस.टी. प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रकरणांच्या विशेष न्यायालयात या खटल्यातील अंतिम युक्तिवाद ७ एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल २५ एप्रिलला जाहीर करण्यासाठी राखून ठेवला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will enjoy in jail says asaram bapu
First published on: 25-04-2018 at 19:48 IST