अयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीला पर्याय म्हणून देण्यात आलेल्या जागेवर बांधल्या जाणाऱ्या मशिदीच्या पायाभरणीस आपण जाणार नाही, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. या वक्तव्यावर त्यांनी माफी मागावी असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनानंतर दूरचित्रवाणीवर त्यांनी सांगितले होते की, योगी आणि हिंदू असल्याने आपण मशिदीच्या पायाभरणीस जाऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्यावर समाजवादी पक्षाने सांगितले की, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या विधानावर माफी मागावी. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
आदित्यनाथ यांनी असे सांगितले होते की, जर मुख्यमंत्री म्हणून विचाराल तर माझा कुठल्याही धर्म, श्रद्धा व समुदाय यांना विरोध नाही, पण योगी म्हणून विचाराल तर मी मशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही कारण मी हिंदू आहे. मला माझ्या उपासना विधींचा हक्क आहे व त्यानुसार कृती करण्याची मुभा आहे.