उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उभारलेली उद्याने आणि स्मृतिस्थळे आता गरीब कुटुंबीयांच्या विवाहासाठी आणि अन्य समारंभांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी येथे केली. मायावती यांनी उभारलेल्या उद्यानांच्या ठिकाणी रुग्णालये बांधता येतील का, याची पाहणी केली असता ती जागा रुग्णालयांसाठी अगदीच अपुरी असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता उद्यानांची जागा गरीब लोकांच्या विवाहासाठी आणि अन्य समारंभांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अखिलेश यादव म्हणाले.
गरीब महिलांना समाजवादी पार्टीच्या वतीने साडय़ांचे वाटप करण्यात येणार असून त्यापैकी ६० टक्के साडय़ा विणकरांकडून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विणकरांनाही लाभ होईल, असेही अखिलेश यादव म्हणाले.
छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला ही दुर्दैवी घटना आहे. मागास भागांत विकासाची बीजे पेरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून अखिलेश यांनी अशा प्रकारच्या नक्षलवादी हल्ल्यांना पायबंद घालण्याची गरज व्यक्त केली.