जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नात कसूर करणार नाही, त्यासाठी आमच्या भात्यातील सर्व अस्त्रे वापरली जातील, असे  काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सांगितले.

थरूर यांनी मोदी यांच्यावर दी पॅराडॉक्सियल प्राइम मिनिस्टर हे पुस्तक लिहिले असून त्यांनी येथील जयपूर साहित्य महोत्सवात सांगितले की, पंतप्रधानांनी सार्वजनिक पातळीवर सब का साथ सबका विकास सारखी उदारमतवादी विधाने केली. राज्यघटना हाच पवित्र ग्रंथ असल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात ते निवडणुकीतील पाठिंब्यासाठी व राजकीय सुयोग्यतेसाठी अति उदारमतवादी घटकांवर अवलंबून राहिले.

प्रियांका गांधी यांना काँग्रेसमध्ये सरचिटणीसपद दिल्याबाबत ते म्हणाले की, प्रियंका यांच्याकडे करिष्मा आहे त्या मतदारांवर प्रभाव पाडू शकतात व त्यांचा प्रवेश हा पक्षासाठी फायद्याचाच आहे. आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेस आपल्या भात्यातील सर्व अस्त्रे वापरण्यास हयगय करणार नाही. आतापर्यंत प्रियंका यांची भूमिका मर्यादित होती. त्या पडद्याआडून काम करीत होत्या, अमेठी व रायबरेली या दोनच मतदारसंघात त्यांनी काम केले पण आता त्यांचे कार्यक्षेत्र मोठे असणार आहे. आता आम्ही आमच्या भात्यातील कोणतीही अस्त्रे राखून ठेवणार नाही. मोदींना उखडून टाकणे हाच काँग्रेसचा हेतू आहे. मोदी व त्यांच्या सरकारला सत्तेवरून पायउतार करणे महत्त्वाचे आहे. प्रियंका गांधी यांनी जाहीरपणे त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले नसले तरी खासगीत त्यांनी अनेक प्रश्नांवर पक्षाला मदत केली आहे. ज्यांनी त्यांना दूरचित्रवाणीवर बोलताना पाहिले असेल त्यांना त्यांची बोलण्यातील चतुराई, लोकांशी नाते जुळवण्याचे कसब माहिती आहे त्यामुळे त्या राजकारण नवख्यासारखे वागत नाहीत असेच दिसून  आले आहे.

गोरक्षकांचा धुमाकूळ, घरवापसी, लव्ह जिहाद या प्रश्नावंर पंतप्रधानांनी मौन पाळले आहे. मोदी हे हिंदीतील चांगले वक्ते आहेत, पण त्यांच्याकडे नैतिक नेतृत्व नाही.

जमावाने ठार केलेले महंमद अखलाख,जुनैद खान, पेहलू खान, आत्महत्या करणारा रोहित वेमुला व राजस्थानात फटके मारण्यात आलेली दलित मुले यांच्या वेदना त्यांना दिसल्या नाहीत, त्यावर ते एक शब्दही बोलले नाहीत.