X

इम्रान खान मिठी मारण्यासाठी पुढे आला तर विराट कोहली पाठ दाखवणार का ? – नवज्योत सिंग सिद्धू

सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या गळाभेटीचं समर्थन करताना माझी गळाभेट म्हणजे राफेल करार नव्हता असा टोला मारला आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला हजेरी लावल्याबद्दल तसंच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेण्यावरुन भाजपाने नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सिद्धू यांनी देशवासियांना धोका दिल्याचं भाजपाने म्हटलं आहे. दरम्यान सिद्धू यांनी आपल्या गळाभेटीचं समर्थन करताना माझी गळाभेट म्हणजे राफेल करार नव्हता असा टोला मारला आहे. आपली बाजू मांडताना त्यांनी आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याचं उदाहरण दिलं आहे.

‘आज आपण पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळत आहोत. मग भारतीय खेळाडू पाकिस्तान खेळाडूंकडे पाठ करणार का ? त्यांना पाठ दाखवत ते उभे राहणार का ? समजा जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मैदानावर आले आणि विराटला सदिच्छा देत गळाभेट घेण्याची इच्छा व्यक्त केली तर विराट त्यांच्याकडे पाठ करुन उभा राहणार का ?’, असं नवज्योस सिंग सिद्धू बोलले आहेत.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मिठी मारणे हे प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत होती कारण ते बाबा नानक यांच्याबद्दल बोलत होते असा सिद्धू यांचा दावा आहे. १८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला हजर लावल्याबद्दल सिद्ध यांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं.