पाकिस्तानचे अत्याधुनिक F-16 विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान कॉकपीटमध्ये परतले आहेत. त्यांनी मिग-२१ विमानाचे उड्डाण सुरु केले आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर झालेल्या डॉगफाइटमध्ये अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. विमान कोसळण्याआधी अभिनंदन यांनी क्षेपणास्त्र डागून पाकचे एफ-१६ विमान पाडले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

मिग-२१ मधून इजेक्ट झाल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना ते जखमी झाले होते. तब्बल सहा महिन्यानंतर दुखापतीवर मात करुन अभिनंदन कॉकपीटमध्ये परतले आहेत. अभिनंदन यांना राजस्थानमधील आयएएफच्या तळावर तैनात करण्यात आले आहे. त्यांनी विमान उड्डाणाचा सराव सुरु केला आहे.

वर्थमान दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतल्यामुळे एक मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची सुटका केली. २७ फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला. परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. हवाई दलाच्या बंगळुरु येथील एअरोस्पेस मेडीसीन विभागाने वर्थमान यांना विमान उड्डाणासाठी परवानगी दिली. पाकिस्तानच्या ताब्यात असतानाही वर्थमान यांनी जी हिम्मत दाखवली ते खरच कौतुकास्पद होते.